सायन-पनवेल मार्ग व जिजाबाई भोसले मार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 01:38 AM2019-11-14T01:38:20+5:302019-11-14T01:38:23+5:30
मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे नागरिकांना ठिकठिकाणी वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.
मुंबई : मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे नागरिकांना ठिकठिकाणी वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता उड्डाणपुलाच्या व रस्ते दुरुस्तीच्या कामांमुळे नागरिकांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील खाडीपुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या दोन लेन बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे वाहतूक विरुद्ध दिशेच्या मार्गावर तसेच पनवेलकडे जाणारी वाहतूक जुन्या पुलावरून वळवण्यात आली आहे. सकाळी व संध्याकाळच्या सुमारास दोन्ही दिशेला जाणाºया मार्गांवर वाहतूककोंडी होत आहे. वाहतूककोंडी व पथकर नाक्यावर लावाव्या लागणाºया रांगा यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या मार्गावरील मानखुर्द व देवनार परिसरात अद्यापही खड्डे बुजविले गेले नसल्याने वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
मानखुर्द, घाटकोपर या परिसरांना जोडणाºया जिजाबाई भोसले मार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. या मार्गावरील शिवाजीनगर परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर वाहतुकीचा वेग अत्यंत मंदावलेला असतो. अनेकदा बांधकामाचे साहित्य घेऊन जाणारे ट्रक, ट्रेलर व जेसीबी यांमुळे वाहतूककोंडीत भर पडते. पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी ते घाटकोपरच्या मध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने चेंबूरच्या दिशेने जाणाºया मुख्य मार्गावर तसेच सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. या सर्व मार्गांवरील वाहतूककोंडीतून सुटका कधी होणार याची मुंबईकर वाट पाहत आहेत.