नवी मुंबई : वाहतूक पोलिसांच्या वतीने नवी मुंबईत रिक्षांना ट्रॅफिक स्मार्ट आयकार्ड बसवण्याला सुरवात झाली आहे. त्याद्वारे रिक्षातील प्रवाशाला त्याच्याकडील मोबाइलवरच रिक्षा चालकाची माहिती कळणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोमवारी याचा शुभारंभ आयुक्त के. एल. प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला.नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने शहरात रस्ता सुरक्षा सप्ताह सुरु आहे. या सप्ताहानिमित्ताने वाशी खाडीपूल येथील वाहतूक पोलिसांच्या नूतनीकरण झालेल्या शाखेचा उद्घाटन समारंभ सोमवारी झाला. याप्रसंगी पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद, अपर आयुक्त फत्तेसिंह पाटील, वाहतूक उपआयुक्त अरविंद साळवे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी ट्रॅफिक स्मार्ट कार्डचा शुभारंभ देखील करण्यात आला. प्रवाशांच्या सुरक्षेच्या उद्देशाने हे स्मार्ट कार्ड रिक्षांमध्ये बसवले जात असून ते रिक्षा चालकांना ऐच्छिक आहे. रिक्षामध्ये बसवल्या जाणाऱ्या या स्मार्ट कार्डवर क्यूआर कोड (क्विक रिस्पॉन्स कोड) असणार आहे. हा कोड प्रवाशाने त्याच्याकडील स्मार्ट फोनमधील सेफजर्नी या अॅप्लिकेशनच्या कॅमेरामधून स्कॅन करायचे आहे.हा कोड स्कॅन होताच मोबाइलवर सदर रिक्षा मालकाचे नाव, पत्ता, परमीट नंबर, चालकाचा बॅच नंबर, लायसन्स नंबर, वाहन क्रमांक तसेच चालकाचा मोबाइल नंबर आदी माहिती मिळणार आहे. त्यामुळे रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशावर संकट आल्यास हा प्रवासी संबंधित रिक्षाची माहिती मिळवून पोलीस अथवा नातेवाईकांना कळवू शकणार आहे. सध्या २०१९ स्मार्ट कार्ड तयार झालेले आहेत. या संकल्पनेमुळे रात्री अपरात्री एकट्या प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होणार आहे. हे स्मार्ट कार्ड रिक्षा चालकाच्या सीटच्या मागच्या बाजूला बसवले जाणार आहेत. त्याकरिता नागरिकांना आपल्या मोबाइल फोनवर सेफजर्नी हे अॅण्ड्रॉईड अॅप्लिकेशन घ्यावे लागणार आहे. यामुळे प्रवासादरम्यान होणारी छेडछाडी आणि इतर घटनांचा तपास करणे शक्य होईल.(प्रतिनिधी)
सुरक्षेसाठी रिक्षात ट्रॅफिक स्मार्ट कार्ड
By admin | Published: January 13, 2015 1:01 AM