अस्ताव्यस्त पार्र्किं गमुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूककोंडी; नागरिक हैराण
By admin | Published: February 11, 2015 10:58 PM2015-02-11T22:58:08+5:302015-02-11T22:58:08+5:30
जिलानी वाडी आदींचा यात समावेश आहे. ६० टक्के भाग हा अनधिकृत बांधकामांचा असून, ४० टक्के भाग हा इमारतींनी व्यापला आहे
अजित मांडके, ठाणे
प्रभाग क्र. ३६ मध्ये अनधिकृत फेरीवाल्यांबरोबर या भागात असलेल्या अस्ताव्यस्त पार्कींगच्या विळख्यामुळे येथील मुख्य रस्ते कित्येक वेळेस वाहतूककोडींने ग्रस्त असतात. त्यातही या प्रभागात असलेला एकमेव रायलादेवी तलाव हा आजही दुर्लक्षित आहे. या तलावाच्या अवतीभोवती होणाऱ्या अश्लिल कृत्यांबरोबर, अनैतिक उद्योगांमुळे येथील रहिवासी हैराण झाले आहेत.
या प्रभागाची लोकसंख्या ही २३ हजारांच्या घरात असून येथे तीन हात नाका, आरटीओचे मुख्य कार्यालय, हाजुरीचा काही परिसर, रघुनाथ नगर, महाराष्ट्र नगर, पडवळनगरचा काही भाग, डिसोझा वाडी, मीनाताई ठाकरे रुग्णालय, शिवकृपा सोसायटी, जिलानी वाडी आदींचा यात समावेश आहे. ६० टक्के भाग हा अनधिकृत बांधकामांचा असून, ४० टक्के भाग हा इमारतींनी व्यापला आहे. या भागातील रस्ते, पायवाटा आदींच्या समस्या नसल्या तरी या भागातील सर्वात मोठी समस्या ही अनधिकृतपणे होणारी पार्कींग आणि वाहतूककोंडी हीच मानली जात आहे. तीनहातनाका परिसर आणि दत्त मंदिर या भागात मोठमोठे ट्रक पार्क केले जात आहेत. तसेच येथे खाजगी ट्रॅव्हल्सच्या वाहनांचीही वर्दळ सुरु असते. त्यामुळे या भागात सकाळ, संध्याकाळ आणि रात्रीच्या वेळेस वाहतूककोंडी होत असते. या संदर्भात तक्रार केल्यास येथील ट्रॅक युनियनचे पदाधिकारी दादागीरी करीत असल्याचे मत येथील रहिवाशांनी व्यक्त केले. परंतु यामुळे या भागात अनैतिक धंद्याना वाव मिळत असल्याचे नगरसेवकच मान्य करीत आहेत. त्यामुळे या भागातून ये जा करतांना नागरीकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातही एलआयसी कार्यालय, आरटीओ, चेकनाका या भागातही अशाच प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आरटीओ सर्व्हीस रस्ता हा येथे येणाऱ्या वाहनांमुळे गच्च भरलेला असतो. परंतु यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई होत नाही.
या भागातील दुसरी समस्या म्हणजे येथे ३३ एकराच्या भूखंडावर वसलेला रायलादेवी तलाव असून, त्याचा वाद अद्यापही मिटला नसल्याने या तलावाला उतरती कळा आली आहे. तलावाच्या अवती भोवती अनैतिक धंदे सुरु असून, काही ठिकाणी जुगारांचे फडही रंगत आहेत. तलावाच्या संरक्षक भितींची अवस्था दयनीय असून येथील उद्यानाची अवस्था देखील बिकट आहे. परंतु या तलावाला अद्यापही झळाळी लाभलेली नाही.
सध्या येथे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले आहे. परंतु त्यांची देखभाल कोण करणार हा देखील प्रश्न अनुत्तरीतच आहे. या प्रभागात रघुनाथ नगर भागात आरोग्य केंद्राचे आरक्षण आहे. संकल्प चौकात जॉगींग ट्रॅक सुरु करण्याचा नगरसेवकांचा मानस आहे. या प्रभागात पालिकेच्या शाळा क्रमांक १२२, १३९ असून त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. या शाळांची दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याची माहिती नगरसेवक देतात. त्यातही येथील जिलानी वाडीतील १०९ बेघर कुटुंबांचा मुद्दा आजही सुटू शकलेला नाही.