मुंबई : सी वाॅर्डमध्ये सध्या पदपथासह रस्तेही अनधिकृत फेरीवाल्यांनी काबीज केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पालिकेला तक्रार करूनही अधिकारी कारवाई करत नसल्यामुळे फेरीवाले वाढत आहेत, असा आरोप रहिवासी करत आहेत.
सी वाॅर्डमधील अनधिकृत फेरीवाले वाढल्याने ग्राहकांची झुंबड होते. मुख्यतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत फेरीवाल्यांना बसण्यास सक्त मनाई आहे. तरीही या ठिकाणी सी विभागामध्ये अनधिकृत फेरीवाले बसत आहेत. विशेषतः सामाजिक अंतराचे पालन न केल्यामुळे इथे कोरोनाचे प्रमाण वाढू शकते. यामुळे येथील स्थानिक नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. दवाबाजार, प्रिन्सेस स्ट्रीट, भुलेश्वर, लोहार चाळ, शेख मेमन स्ट्रीट, जंजिकर स्ट्रीट, धोबी तलाव या रस्त्यांवर दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. रस्त्यावर प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते, ये-जा करण्यासाठी जागा नसते.स्थानिक रहिवासी अलोक तिवारी म्हणाले की, अनेक वेळा अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रार केली असता सी विभागातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी ठोस कारवाई करत नाहीत. अनधिकृत फेरीवाले वाढल्याने प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. याचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे येथे अनधिकृत फेरीवाल्यांना पालिकेने व पोलीस प्रशासनाने थारा देऊ नये, तसेच कायदेशीर कारवाई करावी.
सी वाॅर्डमधील अतिक्रमणाबाबत अनेक वेळा नागरिकांनी व मी स्वतः तक्रार दिली आहे. परंतु तात्पुरती कारवाई केली जाते. भुलेश्वरमध्ये गर्दी होत असल्याने आग लागली असता अग्निशमन दलाची गाडी जाण्यासाठी जागा नाही. अनधिकृत फेरीवाल्यांमुळे गँग वाढून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. महापालिका व पोलीस प्रशासनाने भुलेश्वर अतिक्रमण पूर्णतः बंद केले नाही तर मी स्वतः भुलेश्वरमध्ये तीव्र आंदोलन करेन. - आकाश पुरोहित, स्थानिक नगरसेवक