Join us

पावसाळ्यातही वाहतूक सुरळीत राहील

By admin | Published: June 02, 2017 6:13 AM

पावसाळ्यादरम्यान मुंबईकरांची होणारी असुविधा कमी करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पावसाळ्यादरम्यान मुंबईकरांची होणारी असुविधा कमी करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी प्राधिकरणाच्या अखत्यारीतील पश्चिम शहरी मार्गावरील २५ किलोमीटर लांबीच्या माहीम कॉजवे ते दहिसर(पूर्व) या परिसराची पाहणी केली. पाहणीवेळी पावसाळ्यातही येथील वाहतूक सुरळीत राहील, अशी ग्वाही मदान यांनी दिली.पश्चिम शहरी मार्गावरील दोन्ही बाजूंकडील नाल्यातील गाळ सफाईचे काम आणि रस्त्याच्या कोटिंगची पावसाळीपूर्व बहुतांश कामे पूर्ण करण्यात आली आहेत, असे मदान यांनी सांगितले. पश्चिम शहरी मार्गावरील १६.५ किलोमीटर लांबीच्या अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व (मेट्रो मार्ग ७) या प्रकल्पाचीही मदान यांनी पाहणी केली. येत्या पावसाळ्यात येथील वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने ही पाहणी अत्यंत महत्त्वाची असून, पावसाळ्यात येथे वाहतूककोंडी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामधील पायलिंग, पाइल कॅप्स आणि पियरचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा संकल्प एमएमआरडीएने केला आहे. पावसाळ्यात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्त्यावरील सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.एमएमआरडीएचे प्रकल्प राबविण्यात येत असलेल्या परिसरात पावसाळ्यादरम्यान होणारी वाहतूक सुरळीत राहावी याकरिता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येत आहेत. प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या भागात पाणी साचणार नाही, याची खबरदारी प्राधिकरण घेणार आहे.- प्रवीण दराडे, अतिरिक्त महानगर आयुक्त, एमएमआरडीए