मुंबई - राज्याच्या परिवहन आयुक्तांनी एक आदेश काढून १८ वर्षांखालील मुलेमुली दुचाकी गाडी चालवत असल्याचे आढळल्यास २५ हजार रुपये दंड तर कराच शिवाय ते २५ वर्षाचे होईपर्यंत वाहन परवानाच देऊ नका, असे आरटीओ कार्यालयांना बजावले आहे.
मोटर वाहन कायद्यातील (२०१९) तरतुदींनुसारच हा आदेश काढण्यात येत असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यात, अल्पवयीन मुले दुचाकी चालवत असल्याचे आढळल्यास त्या मुलाचे पालक किंवा गाडीच्या मालकास तीन वर्षे कैदेची शिक्षा व २५ हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच, अल्पवयीन मुलगा वा मुलगी दुचाकी चालवत असल्याचे निदर्शनास आले तर वयाची २५ वर्षे पूर्ण करेपर्यंत त्यांना वाहन परवाना देऊ नये अशी तरतूद आहे.
या तरतुदीची कडक अंमलबजावणी आता केली जाईल. दुचाकी चालविण्याचा परवाना वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतरच दिला जातो; पण अल्पवयीन असताना ५० सीसीपेक्षा जास्त सीसीची गाडी चालवताना आढळल्यास वयाच्या २५ वर्षापर्यंत वाहन चालकाचा परवाना मिळणार नाही.
कोणासाठी आदेश?- आरटीओंना हा आदेश ५० पाठविण्यात आला असून, दर महिन्याला त्याच्या अंमलबजावणीचा अहवाल आपल्याला सादर करावा, असे परिवहन आयुक्तांनी म्हटले आहे.- ५० सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या दुचाकी चालविणाऱ्यांसाठी हा आदेश असेल. १६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलामुलींना विनागिअरच्या आणि ५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या गाड्या चालविण्याची अनुमती कायद्याने आहे.
यावरही होणार कारवाई■ वेगमर्यादा तोडून गाड्या चालविणे, ट्रिपल सीट गाडी चालविणे किंवा हेल्मेट न घालता रेस लावणे अशा प्रकारांवर तत्काळ कारवाई करा, असेही आयुक्तांनी बजावले आहे.■ हेल्मेट न घातल्याने अपघातात जीव गमावल्याच्या घटना राज्यात मोठ्या प्रमाणात घडतात. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत राज्यात रस्ते अपघातात १५ हजार २२४ व्यक्तींचा मृत्यू झाला होता.