लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जाणारे अभिनयाचे शहेनशहा ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी बुधवारी सकाळी साडेसात वाजता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. सायंकाळी सांताक्रूझ येथील दफनभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिलीप कुमार यांना ६ जून रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुप्फुसात पाणी भरण्याचा त्रास त्यांना होत होता. पाच दिवसांच्या उपचारानंतर, प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना ११ जून रोजी घरी सोडण्यात आले होते. ३० जून रोजी पुन्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, यावेळी त्यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि त्यांचे निधन झाले. हिंदुजा रुग्णालयातून त्यांचे पार्थिव वांद्रे येथील निवासस्थानी नेण्यात आले. तिथे चित्रपटसृष्टीसह अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
चित्रपटसृष्टीत दिलीप कुमार या नावाने नावारूपाला आलेल्या दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान असे होते. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी पाकिस्तानातील पेशावर येथे झाला होता. १९४४ मध्ये आलेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. मात्र, हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर त्यांचा ‘मिलन’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘राम और श्याम’,‘ क्रांती’, ‘शक्ती’, ‘मशाल’, ‘अंदाज’, ‘आण’, ‘दाग’, ‘देवदास’, ‘आझाद’, ‘मुघल ए आझम’, ‘गंगा जमूना’, ‘कर्मा’, ‘सौदागर’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिलीप कुमार यांच्या नावावर आहेत. ‘किला’ हा त्यांच्या कारकीर्दीतील अखेरचा चित्रपट ठरला.
तब्बल आठ वेळा त्यांनी अभिनयासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला आहे. चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि अतुलनीय कारकीर्दीबद्दल १९९४ साली केंद्र सरकारने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित केले होते, तर १९९८ मध्ये पाकिस्तान सरकारने त्यांना निशान-ए-पाकिस्तान हा पुरस्कार बहाल केला होता. दिलीप कुमार यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले; परंतु त्यांनी त्यावर यशस्वीपणे मात केली.
दिलीप कुमार यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांचे निकटवर्तीय फैजल फारुकी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. ते म्हणाले, मी जड अंतकरणाने सांगू इच्छितो की, आपले सर्वांचे लाडके दिलीप साहेब काही वेळापूर्वी आपल्याला सोडून गेले आहेत, आपण देवाकडून आलो आहोत तर आपल्याकडे पुन्हा तिथेच जायचे आहे.
त्यांनी शंभर वर्षे जगावे, अशी आमची इच्छा होती.
‘आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी १०० वर्षे पूर्ण करावीत, अशी आमची इच्छा होती. वयाच्या ९८ व्या वर्षी प्रत्येक व्यक्तीला शरीरात अनेक समस्या उद्भवतात. डॉ. निखिल गोखले सतत दिलीप कुमार यांची काळजी घेत होते. सकाळी सायराबानोही त्यांच्यासोबत इस्पितळात होत्या. डॉ. निखिल वीस वर्षांहून अधिक काळ त्यांच्यावर उपचार करत होते. आम्ही न्यूरोलॉजिस्ट आणि शल्यचिकित्सक यांच्यासोबत एकत्र येऊन त्यांच्यावर उपचार केले. त्यांच्यासारखा माणूस बॉलिवूडमध्ये क्वचितच जन्माला येईल. त्यांनी जगात भारताचे नाव उंचावले, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, असे डॉ. जलील पारकर म्हणाले.