गोरेवागावात शाळकरी मुलीचा डंपरच्या धडकेत मृत्यू; लेकीला मांडीवर घेऊन बसून होता बाप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 02:35 PM2024-10-01T14:35:43+5:302024-10-01T15:00:45+5:30
गोरेगावात मंगळवारी सकाळी शाळेसाठी निघालेल्या एका चिमुरडीचा अपघाती मृत्यू झाला आहे.
Mumbai Accident : मुंबईतूनअपघाताची भीषण घटना समोर आली आहे. गोरेगाव येथे झालेल्या भीषण अपघातात १३ वर्षीय शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर मुलीचे वडील जखमी झाले आहेत. डंपरखाली चिरडली गेल्यामुळे मुलीला जीव गमवावा लागला आहे. वडिलांसोबत शाळेत जात असतानाच हा दुर्दैवी अपघात झाला. अपघातानंतर जखमी मुलीला पाहून वडिलांच्या पाया खालची जमीन सरकली होती. पोलिसांनी याप्रकरणी डंपर चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु केला आहे.
मुंबईतील गोरेगाव येथील फिल्मसिटी रोडवर मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. ही घटना ओबेरॉय मॉलजवळ घडली. मुलगी तिच्या वडिलांसोबत बाईकवरुन शाळेत जात होती. डंपरने तिला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर वडील या अपघातात जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन डंपर चालकाला अटक केली आहे.
मृत विनमयी मोरे ही सकाळी ६.३० च्या सुमारास वडील रमेश यांच्यासोबत बाईकने शाळेला जात होती. रमेश मोरे हे विन्मयीच्या शाळेकडे जाण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गावरून दिंडोशीच्या दिशेने डावीकडे वळण घेत होते. त्यावेळी वळणावर एक डंपरही येत होता. त्याने रमेश मोरे यांच्या बाईकला धडक दिली. धडकेमुळे विनमयी खाली पडून गंभीर जखमी झाली. तिचे वडीलही जखमी झाले. अपघातानंतर विनमयीला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले.
रमेश मोरे यांच्या बाईकला डंपरने इतक्या जोरात धडक दिली की, विनमयी खाली पडली आणि तिच्या शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यामुळे विनमयीने जागेवरच प्राण सोडले. या अपघातामध्ये रमेश मोरे यांनाही गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर ते बराच वेळ विनमयीला मांडीवर घेऊन रस्त्यावरच बसून होते. त्यानंतर दोघांना वडिलांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर विनमयीला मृत घोषित केले.
या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डंपर चालकाला अटक केली आणि पुढील तपास सुरु केला आहे. विनमयीच्या मृत्यूने मोरे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, आणखी एका घटनेत, चेंबूरमधील सिंधी कॉलनीजवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सुनील खंडू पालके या ३९ वर्षीय प्लंबरचा रविवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची चुनाभट्टी पोलिसांनी नोंद केली असून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. या घटनेत सहभागी असलेले वाहन आणि चालक दोघांची ओळख पटवण्याच्या पोलीस प्रयत्न करत आहेत.