एक्स्प्रेसचा अपघात, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ऐन सकाळी चाकरमान्यांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 10:49 AM2022-04-16T10:49:52+5:302022-04-16T11:08:01+5:30
Train Accident At Matunga Mumbai :काल रात्री पावणे दहाच्या सुमारास माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे क्रमांक 11005 दादर पुद्दुचेरी एक्स्प्रेसला मोठा अपघात झाला.
मुंबई : मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या रेल्वेच्या अपघातामुळे लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. काल पुद्दुचेरी एक्स्प्रेसने गदग एक्स्प्रेसला धडक दिल्याने पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले. त्यामुळे फास्ट ट्रॅकवरील वाहतूक बंद करण्यात आली. या अपघाताचा परिणाम लोकल आणि लांबपल्ल्याच्या सेवेवर झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. स्टेशनवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. फास्ट ट्रॅकवरील कल्याण सीएसएमटी मार्गावरील जलद लोकल सेवा सकाळी साडे आठ वाजता पूर्ववत झाली आहे तर सीएसएमटी कल्याण जलद ट्रॅकवरील सेवा पूर्ववत होण्यास दुपारचे 12 वाजणार आहे. या अपघातानंतर या मार्गावरील लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
महालक्ष्मी एक्सप्रेस दादरला सकाळी 7.15 वाजता पोहोचते मात्र ती सकाळी 8.55 वाजता पोहोचली आहे. ठाणे ते माटुंगा दरम्यान अनेक स्लो गाड्या रांगेत आहेत. सिग्नल मिळत नसल्याने अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. यामुळे मुंबईकरांची मोठी अडचण झाली आहे. ऐन कामाच्या वेळेत चाकरमान्यांना मोठ्या फटका बसत आहे. सोबतच अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागण्याची शक्यता आहे.
ठाणे - माटुंगा येथील दुर्घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने होत आहे. त्यामुळे लोकलला गर्दी असून, ठाणे स्टेशनजवळून सोडण्यात येत असलेल्या विशेष बससाठीही प्रवाशांची गर्दी झाली आहे. ( व्हिडीओ विशाल हळदे) pic.twitter.com/TjX5hT38OA
— Lokmat (@lokmat) April 16, 2022
दरम्यान, काल रात्री पावणे दहाच्या सुमारास माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे क्रमांक 11005 दादर पुद्दुचेरी एक्स्प्रेसला मोठा अपघात झाला. गदक एक्सप्रेस आणि पुद्दुचेरी एक्सप्रेस बाजूने एकमेकांवर आदळल्या, या दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात होत्या आणि क्रॉसिंगवर एकाच ट्रॅकवर आल्या त्यामुळे हा अपघात झाला. यामध्य पुद्दुचेरी एक्सप्रेसचे शेवटचे डबे रेल्वेरुळावरून घसरले.
लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा, या एक्सप्रेस रद्द
एक्सप्रेस स्लो ट्रॅकवर वळवल्याने स्लो गाड्यांचे वेळापत्रक देखील कोलमडले आहे. फास्ट लोकल वाहतूक धीम्या गतीने आहे. तर सीएसएमटी ते कल्याण फास्ट ट्रॅक सुरु व्हायला दुपारी 12 वाजणार असल्याची माहिती आहे. कल्याण ते सीएसएमटी फास्ट ट्रॅकवरील लोकल सुरु असून सरासरी दोन तास उशिराने गाड्या आहे. अनेक एक्सप्रेस देखील सरासरी दोन तासाने उशिराने धावत आहेत.