पासधारकांसाठी रेल्वेच ‘बेस्ट’
By Admin | Published: July 19, 2014 01:24 AM2014-07-19T01:24:27+5:302014-07-19T01:24:27+5:30
रेल्वे मंत्रालयाकडून लोकलच्या पास दरात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्रीच लागली.
सुशांत मोरे, मुंबई
रेल्वे मंत्रालयाकडून लोकलच्या पास दरात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्रीच लागली. मात्र त्यानंतर या निर्णयात बदल करून लोकल प्रवाशांना दिलासाही रेल्वेने दिला. तरीही लोकल पासधारकांना आताचा प्रवास महाग वाटत असला तरी मुंबईत धावणाऱ्या बेस्ट, रिक्षा, टॅक्सी, मेट्रोपेक्षा रेल्वे प्रवास स्वस्त असल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे. तसेच अन्य परदेशांशी तुलना करतानाही मुंबईतील लोकल प्रवास ‘बेस्ट’ असल्याचे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांनी सांगितले आहे.
रेल्वे मंत्रालयाने लोकलच्या पासात शंभर टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. २५ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार होती. मात्र या निर्णयामुळे मुंबई शहर आणि उपनगरात लोकलमधून प्रवास करणाऱ्या पासधारकांचा प्रवास दुप्पट किमतीने वाढणार होता. खिशाला मोठी कात्रीच लागणार असल्याने रेल्वेच्या या निर्णयाला मुंबईतून मोठा विरोध करण्यात आला. त्यामुळे या निर्णयात बदल करत १४.२ टक्केच वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईकरांना दिलासा दिला. तरीही ही वाढ अयोग्यच असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आले. याबाबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांनी सांगितले की, लोकल पासधारकांचा प्रवास आता स्वस्तच झाला आहे. मुंबईत अन्य परिवहन सेवाही असून त्यांच्याशी तुलना केल्यास रेल्वेचा प्रवास खूपच स्वस्त आहे. प्रथम श्रेणीच्या मासिक पासाची किंमत पाहिल्यास प्रत्येक किलोमीटरमागे (३५ किलोमीटरपर्यंत) आता 0.३७ पैसे मोजावे लागत आहेत. तर द्वितीय श्रेणीच्या मासिक पासामागे प्रत्येक किलोमीटरमागे 0.११ पैसे मोजावे लागत असल्याची माहिती दिली. मात्र बेस्टमधून प्रवास करणाऱ्यांना सध्या प्रत्येक किलोमीटरमागे 0.८२ पैसे, बेस्टच्या एसी बसमधून प्रवास करणाऱ्यांना २ रुपये ६५ पैसे मोजावे लागत आहेत. सर्वात जास्त पैसे मुंबईकरांना टॅक्सी आणि एसी कॅबसाठी मोजावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तर सुरू झालेल्या मेट्रोमुळे प्रत्येक किलोमीटरमागे ३.६३ पैसे द्यावे लागत असून यातून रेल्वेचा प्रवास स्वस्त असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचा दावाच त्यांनी केला.