दादर-परळदरम्यान रेल्वे विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 05:44 AM2019-03-05T05:44:14+5:302019-03-05T05:44:23+5:30
मध्य रेल्वे मार्गावरील दादर ते परळदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास विस्कळीत झाली.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील दादर ते परळदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास विस्कळीत झाली. लोकल बराच वेळ एकाच ठिकाणी थांबल्याने काही प्रवाशांनी लोकलमधून उडी मारली आणि भर उन्हात ते रेल्वे रुळांवरून चालत पुढील स्थानकावर पोहोचले.
रविवारी परळ उपनगरीय टर्मिनसचे उद्घाटन करण्यात आले. मात्र उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी परळ उपनगरीय टर्मिनसवरील सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल उशिराने धावत होत्या. दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या या बिघाडामुळे धिम्या मार्गावरील दोन्ही दिशेकडे जाणारी लोकल सेवा तब्बल ३० ते ४५ मिनिटे उशिराने धावत होती. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वे प्रशासनाची दर सोमवारी लोकलच्या वेळापत्रकावर, उशिरा येणाऱ्या लोकलवर, तांत्रिक बिघाडावर बैठक घेण्यात येते. मात्र याच दिवशी अनेकदा रेल्वे सेवा विस्कळीत होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.