मुंबई, दि. 13 -हार्बर रेल्वेच्या कॉटन ग्रीन स्थानकाजवळ ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हार्बर रेल्वेचा खोळंबा झाला होता. पण आता हार्बर रेल्वेची वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती मिळते आहे. अप दिशेने जाणाऱ्या लोकलच्या इंजिनमध्ये कॉटन ग्रीन स्थानकाजवळ बिघाड झाला होता. त्यानंतर 22 मिनीटांसाठी हार्बर रेल्वेचा खोळंबा झाला होता. आता रेल्वेची 9 वाजून 50 मिनिटांनी हार्बर रेल्वे सुरळीत झाल्याची माहिती हार्बर रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ट्रेनच्या इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे हार्बर रेल्वेची पनवेलहून सीएसटीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. हार्बर रेल्वेवर झालेल्या या घटनेमुळे ऐन कामाच्या वेळी प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला.
हार्बर रेल्वे मार्गावर नेहमी घडणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातो आहे. मार्गावर सातत्याने वाहतूक रखडत असल्याने त्यावर ठोस उपाय योजना करण्याची मागणी होते आहे.
दोन आठवड्यांपूर्वी सीएसटीहून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे सहा डबे रूळावरून घसरले होते. माहिमजवळ ट्रक क्रॉस करताना ही घटना घडली होती. त्यामुळे रेल्वे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. या अपघातात एका महिलेसह सहा प्रवासी जखमी झाले होते.