३० जूनपर्यंत रेल्वेची तिकिटे रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 06:28 PM2020-05-14T18:28:46+5:302020-05-14T18:29:18+5:30
रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
मुंबई : कोरोनाच्या महामारीच्या काळात २२ मार्चपासून प्रवासी रेल्वे सेवा बंद आहे. दरम्यान, श्रमिक विशेष ट्रेन, विशेष वातानुकूलित रेल्वे सेवा सुरू आहे. मात्र रेल्वेने ३० जूनपर्यंत रेल्वेने आरक्षित तिकिटे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिकिटांचा परतावा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येणार आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्ववभूमीवर रेल्वे मंत्रालयाने प्रीमियम, मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर, उपनगरीय गाड्या, कोलकाता मेट्रो रेल, कोकण रेल्वे सेवा रद्द ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एक्सप्रेस सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी काढलेल्या तिकिटांचा परतावा रेल्वे प्रशासन करत आहे. आता ३० जून रोजी आणि त्यापूर्वीच्या प्रवासासाठी नियमित प्रवासी गाड्यांसाठी सर्व तिकिटे रद्द केली गेली आहे. दरम्यान, अडकलेल्या ठिकाणी मजुरांना, कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी श्रमिक विशेष ट्रेन सुरु आहे. यासह नवी दिल्लीहून दिब्रुगढ, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवनंतपुरम, मडगाव, अहमदाबाद व जम्मू-तावी या शहरांसाठी या गाड्यासोडण्यात येत आहेत. परतीच्या प्रवासात पुन्हा त्याच स्टेशनवरून या गाड्या दिल्लीसाठी सुटत आहेत.
विशेष ट्रेनच्या १५ मार्गावर दोन्ही दिशेकडील मार्गावर गाड्या धावत आहेत. या गाड्यांना आता वेटिंग तिकिटाची सोय देण्यात आली आहे. कोरोनाचा पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या १७ मेनंतर देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सरु होणार असल्याचे आपल्या संबोधनातून सांगितले होते. या लॉकडाऊनमध्ये काही नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. त्याबद्दल लवकरच केंद्राकडून दिशानिर्देशही जाहीर केले जाणार आहेत. मात्र, त्याआधीच रेल्वेने थेट ३० जूनपर्यंत प्रवासी तिकिटांचे बुकिंग रद्द केले आहेत. त्यामुळे आता हे लॉकडाऊन कधीपर्यंत असणार असा प्रश्न नागिरकांना पडला आहे.
--------------------------------------------
१३९ हेल्पलाईनवर संपर्क साधून तिकिटांचा परतावा मिळणार
रेल्वे मंत्रालयाने देशातील सर्व प्रवासी रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या काळात तिकीट काढलेल्या प्रवाशांचा प्रवास रद्द झाला.परिणामी, त्यांना तिकिटाचा परतावा मिळत आहे. रद्द करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसचे ऑनलाईन तिकिटांचा परतावा रेल्वेकडून देण्यात येत आहे. यासह आता तिकिट खिडकीवर काढलेल्या रेल्वे तिकिटांचा परतावा रेल्वेच्या १३९ या हेल्पलाइन वरून मिळणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली. ज्या प्रवाशांनी तिकीटे ऑनलाईन आरक्षित केली होती. त्यांच्या बँक खात्यात परताव्याची रक्कम स्वयंचलितपणे पाठविली जात होती. ज्यांनी तिकीट खिडकीवर तिकीट आरक्षित केले होते. त्यांना तिकीट परतावा मिळण्यासाठी अडचणी येत होत्या. कारण सर्व आरक्षण केंद्रे बंद होती. त्यामुळे आयआरसीटीसीने नवीन योजना आखली आहे. त्यानुसार रेल्वे हेल्पलाईन क्रमांक १३९ वरुन काही पर्याय वापरताच परताव्याची रक्कम स्वयंचलितपणे प्रवाशाच्या खात्यात वळविण्यात येणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
--------------------------------------------