एटीएसचीच गाडी पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 04:44 AM2018-02-24T04:44:54+5:302018-02-24T04:44:54+5:30
दहशतवाद्यांच्या बारीकसारीक हालचालींवर करडी नजर ठेवून त्यांचे मनसुबे उधळून लावणाºया राज्य दहशतवादविरोधी पथकावर (एटीएस) एका चोरट्यामुळे नामुष्की ओढावली आहे.
मनीषा म्हात्रे
मुंबई : दहशतवाद्यांच्या बारीकसारीक हालचालींवर करडी नजर ठेवून त्यांचे मनसुबे उधळून लावणाºया राज्य दहशतवादविरोधी पथकावर (एटीएस) एका चोरट्यामुळे नामुष्की ओढावली आहे.
टिळकनगर पोलीस क्वॉर्टर्स परिसरात पहाटेच्या सुमारास पार्क केलेली काळाचौकी एटीएस विभागाची बोलेरो जीप घेऊन तो पळाल्याचा प्रकार गुरुवारी घडला. या प्रकरणी एटीएस अधिकाºयाच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी सरकारी वाहन चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरूकेला आहे. मात्र एटीएस आणि पोलीस दलाची नाचक्की होऊ नये म्हणून या प्रकरणी पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी कमालीची गुप्तता पाळल्याचे समजते.
काळाचौकी एटीएस विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप कुडे हे गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास बोलेरो जीप घेऊन घराकडे आले. ते टिळकनगर पोलीस क्वॉर्टर्समध्ये राहतात. टिळकनगर पोलीस ठाण्यालगतच या इमारती आहेत. वसाहतीतच जीप पार्क करून ते घरी आले. घरी जेवण उरकून झोपले. सकाळी जीपकडे आले तेव्हा जीप गायब झाल्याने ते हडबडले. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. मात्र तेव्हा जीप आढळून आली नाही. ही बाब त्यांच्या वरिष्ठांना समजताच एटीएसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
प्रदीप कुडे यांनी तत्काळ टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी सरकारी वाहन चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एटीएसचेच वाहन चोरीला गेल्यामुळे मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखा, एटीएस विभाग अधिक तपास करत आहेत. या जीपसह हा चोरटा महाराष्ट्राबाहेर फिरत असल्याची माहितीही गुन्हे शाखेकडून मिळाली.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या ठिकाणाहून पोलीस वसाहतीतून एटीएसचेच वाहन चोरी होणे ही धक्कादायक बाब असून त्यामुळेच आता चोरट्याचा लवकरात लवकर शोध घेण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे.
अधिकाºयांचे मौन
पोलीस वाहन चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरूकेल्याची माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमप आणि टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खैरे यांनी दिली. मात्र याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली आणि याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.
यापूर्वी एटीएस हवालदाराच्या काडतुसांची चोरी
गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात एटीएसचे शिपाई नीलेश मोहिते यांच्या भायखळा पोलीस वसाहतीतील घरातून ३० जिवंत काडतुसे चोरीला गेल्याची घटना घडली होती. या घटनेनेही खळबळ उडाली होती.