Join us

मनपा शाळेतील १५० शिक्षकांना कोविड प्रतिबंध विषयक प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 2:52 PM

Corona News : प्रशिक्षण प्राप्‍त शिक्षक मनपा शाळांमधील इतर शिक्षकांना देणार प्रशिक्षण

अतिरिक्‍त आयुक्‍त सुरेश काकाणी यांच्‍या उपस्थितीत शीव रुग्‍णालयात प्रशिक्षण प्रारंभ

मुंबई : ‘कोविड’ या संसर्गजन्‍य आजाराच्‍या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्‍या शाळांमधील विद्यार्थ्‍यांना सध्‍या ऑनलाईन पध्‍दतीने शिक्षण देण्‍यात येत आहे. तथापि, भविष्‍यात प्रत्‍यक्ष शाळा सुरु करण्‍याची बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाद्वारे याबाबत ‘सुनिश्चित कार्यपध्‍दती’ (SOP) तयार करण्‍यात आली आहे. या अनुषंगाने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या शाळांमध्‍ये येणा-या विद्यार्थ्‍यांनी घ्‍यावयाची काळजी, शिक्षकांनी अमलात आणवयाच्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आणि पालकांनी देखील त्‍यांच्‍या स्‍तरावर घ्‍यावयाची खबरदारी, यासारख्‍या विविध मुदयांबाबत शिक्षकांना सुयोग्‍य प्रशिक्षण मिळावे; या उद्देशाने महापालिका शाळांमधील निवडक १५० शिक्षकांना ‘प्रशिक्षक’ म्‍हणून प्रशिक्षण देण्‍याचा (Training of Trainer) शुभारंभ नुकताच करण्‍यात आला आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त श्री. सुरेश काकाणी यांच्‍या उपस्थितीत नुकताच करण्‍यात आला. हे विशेष प्रशिक्षण शीव परिसरात असणा-या महापालिकेच्‍याच लोकमान्‍य टिळक वैद्यकीय महाविदयालय व सर्वोपचार रुग्‍णालयाद्वारे देण्‍यात येत आहे. या कार्यक्रमाला रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. मोहन जोशी, उपायुक्‍त (सार्वजनिक आरोग्‍य) श्री. देवीदास क्षीरसागर, जन औषध वैद्यकशास्त्र विभागाच्‍या प्रमुख प्रा. डॉ. सीमा बनसोडे – गोखे, शिक्षणाधिकारी श्री.केटल केमिकल प्रा. लि. या खाजगी संस्‍थाद्वारे सहाय्य प्राप्‍त झाले.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या १ हजार १०० पेक्षा अधिक शाळांमध्‍ये २ लाख ५० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्‍यांना शिक्षण देण्‍यासाठी १० हजारांपेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत. ‘कोविड’ या संसर्गजन्‍य आजाराच्‍या पार्श्‍वभूमीवर सर्वच मनपा शाळांमध्‍ये सध्‍या ऑनलाईन पध्‍दतीने शिक्षण देण्‍यात येत असले, तरी निकट भविष्‍यात प्रत्‍यक्ष शाळा सुरु करण्‍याची गरज लक्षात घेत ‘कोविड’ विषयक प्रतिबंधात्‍मक खबरदारीबाबत विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्‍या स्‍तरावर जाणीव-जागृती होणे गरजेचे आहे. जेणेकरुन पालकांनी त्‍यांच्‍या पाल्‍यांना शाळेत पाठवितांना घ्‍यावयाची खबरदारी, तर विद्यार्थ्‍यांनी घरुन शाळेत येताना व शाळेतून घरी जाताना, तसेच शाळेमध्‍ये असताना घ्‍यावयाची खबरदारी याबाबत दैनंदिन जीवनात आवश्‍यक ते सकारात्‍मक बदल करता येऊ शकतील. त्‍याचबरोबर याबाबत शिक्षकांनी घ्‍यावयाची खबरदारी आणि करावयाचे मार्गदर्शन या विषयी देखील सुयोग्‍य जाणीव-जागृती साध्‍य करणे गरजेचे आहे. याच बाबी लक्षात घेऊन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेद्वारे मनपा शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्‍यास नुकतीच सुरुवात करण्‍यात आली आहे.    

या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्‍यान शारि‍रीक दुरीकरण सुयोग्‍य प्रकारे पाळता यावे, यासाठी १२० व्‍यक्‍तींची क्षमता असणा-या सभागृहात दररोज केवळ ३० शिक्षकांना प्रशिक्षण देण्‍यात येत आहे. यानुसार सलग ५ दिवस चालणा-या या प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण १५० शिक्षकांना ‘कोविड’ प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. हे प्रशिक्षण प्राप्‍त शिक्षक त्‍यांच्‍या शाळांमधील इतर शिक्षकांना आणि जवळपासच्‍या परिसरातील मनपा शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रामुख्‍याने सुरक्षित शाळा, कोविड विषयक प्रतिबंधात्‍मक उपाययोजना, शिक्षकांनी घ्‍यावयाची काळजी, विद्यार्थ्‍यांना वेळोवेळी करावयाचे मार्गदर्शन याबाबींचा समावेश आहे, अशी माहिती लोकमान्‍य टिळक महापालिका सर्वोपचार रुग्‍णालयाद्वारे देण्‍यात आली आहे. तर या प्रशिक्षणानंतर याच पध्‍दतीने खासगी – प्राथमिक शाळांमधील शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्‍याचे प्रस्‍तावित असल्‍याचे महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी कळविले आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्यालॉकडाऊन अनलॉक