मेट्रोसाठी स्टेशन कंट्रोलर्स, ट्रेन ऑपरेटर्सना ‘ड्रायव्हिंग सिम्युलेटर’चे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:07 AM2021-01-20T04:07:43+5:302021-01-20T04:07:43+5:30
२ अ, ७ साठी तयारी : स्टेशन कंट्रोलर्स, ट्रेन ऑपरेटर्सना ‘ड्रायव्हिंग सिम्युलेटर’चे धडे फोटो मेल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...
२ अ, ७ साठी तयारी : स्टेशन कंट्रोलर्स, ट्रेन ऑपरेटर्सना ‘ड्रायव्हिंग सिम्युलेटर’चे धडे
फोटो मेल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मेट्रो २ अ आणि ७ साठी येत्या काही दिवसांत मुंबईत रेक दाखल होतील. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण वेगाने काम करत आहे. या कामाचा एक भाग म्हणून स्टेशन कंट्रोलर्स आणि ट्रेन ऑपरेटर्सना एललटीएमटी ॲकॅडमी, हैदराबाद येथे ‘ड्रायव्हिंग सिम्युलेटर’चे प्रशिक्षण देण्यात येईल.
आगामी मेट्रो चाचण्यांची तयारी करण्यासाठी टीमला मुंबई मेट्रोवन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) बरोबरच्या प्रशिक्षण सत्रात मेट्रो परिचालनाचे विविध तंत्र शिकविले जात आहे. अशाच एका प्रशिक्षणाअंतर्गत ई अँड एम टीमने पोईसर मेट्रो स्टेशनला भेट देऊन लिफ्ट, स्पीड टेस्ट आणि एस्कलेटर स्कर्ट फिक्सिंगची अंतर्गत तपासणी केली. त्याद्वारे सुरक्षा उपायांचे पालन केले जाईल, याची खात्री केली. मेट्रो गाड्यांच्या पाॅवरिंगसाठी ओएचई देखभालीचे प्रशिक्षण दिले जात आहे. टेक्निकल ते ऑपरेशनलपर्यंतच्या सर्व टीम मेट्रो चाचण्यांसाठी परिश्रमपूर्वक तयारी करीत आहेत. उत्तरोत्तर या प्रशिक्षणात आणखी वाढ होईल, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला.
* ‘ड्रायव्हिंग सिम्युलेटर’ म्हणजे काय?
प्रत्यक्ष वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यापूर्वी ‘ड्रायव्हिंग सिम्युलेटर’च्या मदतीने काही दिवस प्रशिक्षण दिले जाते. ड्रायव्हिंग करताना पाळायचे प्राथमिक नियम व महत्त्वपूर्ण सूचनांची माहिती या यंत्राद्वारे दिली जाते. याशिवाय दिवस, रात्र, पावसाळा, धोकादायक वळणे अशा विविध प्रकारच्या आव्हानांवेळी वाहन चालवताना काय काळजी घ्यावी, याचेही प्रशिक्षण दिले जाते. या यंत्रावर सराव केल्यानंतर प्रत्यक्ष वाहन चालवताना चालकाला अडचण येत नाही.
..............................