Join us

Maharshtra Election 2019 : निवडणूक कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षा उपकरणे वापरण्याचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 9:04 PM

मंडपांमधील मतदान केंद्रांमध्ये अग्निसुरक्षा उपकरणे सुसज्ज; 9 पेक्षा अधिक मतदान केंद्रे असणाऱ्या ठिकाणी ‘फायरमन’ तैनात

ठळक मुद्दे सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थींना ‘फायर एक्स्टीग्वीशर’ हाताळण्यास देण्यात आले आणि प्रात्यक्षिकाचा भाग म्हणून अग्निशमन देखील करण्यात आले. मुंबई उपनगर जिल्ह्यात सुमारे 2 हजार मतदान केंद्रे ही मंडपांमध्ये आहेत.

मुंबई - विधानसभा मतदारसंघांची संख्या व मतदार संख्या यानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असा लौकीक असणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यात उद्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. मतदारांना अधिक सुलभतेने मतदान करतायावे, यासाठी यंदा प्रथमच सर्व मतदान केंद्रे ही तळमजल्यावर उभारण्यात आली आहेत. तर ज्या ठिकाणी तळमजल्यावर व्यवस्था नाही, तिथे मंडप उभारुन त्यात मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यात सुमारे 2 हजार मतदान केंद्रे ही मंडपांमध्ये आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या निर्देशांनुसार या सर्व मंडपांमध्ये अग्निसुरक्षा उपकरणांची व्यवस्था करण्यात आली असून संबंधित निवडणूक कर्मचाऱ्यांना उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण बृहन्मुंबई महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाद्वारे देण्यात येत आहे. तसेच ज्या ठिकाणी 9 पेक्षा अधिक मतदान केंद्रे आहेत, त्या ठिकाणी मुंबई अग्निशमन दलाचा एक जवान कर्तव्यावर तैनात असणार आहे.मुंबई उपनगर जिल्ह्यातील जी मतदान केंद्रे मंडपांमध्ये आहेत, त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अग्निशमन उपकरणांचा सुयोग्य वापर करता यावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व म्हणजे 26 मतदारसंघातील मतदान केंद्रांवर कार्यरत असणा-या क्षेत्रीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात आले. यापैकी ‘176 - वांद्रे पूर्व’ मतदारसंघातील कर्मचाऱ्यांसाठीचे प्रशिक्षण आज सकाळी वांद्रे शासकीय वसाहतीलगतच्या मैदानात करण्यात आले होते. या कार्यक्रमात अग्निसुरक्षा उपकरणांची हाताळणी करण्याबाबत, तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास घ्यावयाची काळजीविषयी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षण कार्यक्रमाला वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संतोष थिटे, बृहन्मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी व्ही.टी.आव्हाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन चौधरी यांच्यासह वांद्रे –पूर्व विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकारी आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकारी संतोष थिटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकादरम्यान संतोष थिटे यांनी आपत्कालीन व्यवस्थापन व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच वांद्रे –पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये 92 ठिकाणी मतदान केंद्रे ही मंडपामध्ये असून या मतदान केंद्रामध्ये ‘फायर एक्स्टींग्वीशर’, वाळूच्या बादल्या यासारखी अग्निशमन उपकरणे व साधने ठेवण्यात आली आहेत. सदर मतदान केंद्रांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या उपकरणांचा सुयोग्य प्रकारे वापर करता यावा यासाठी या आपत्कालीन विषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी व्ही.टी.आव्हाड यांनी अग्निसुरक्षेची गरज प्रात्यक्षिकांसह मांडतानाच ‘फायर एक्स्टींग्वीशर’ चा वापर कसा करावा याची देखील माहिती प्रात्यक्षिकासह उपस्थितांना दिली व आपत्कालीन परिस्थितीला हाताळण्याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थींना ‘फायर एक्स्टीग्वीशर’ हाताळण्यास देण्यात आले आणि प्रात्यक्षिकाचा भाग म्हणून अग्निशमन देखील करण्यात आले.

टॅग्स :निवडणूकमुंबईआगजिल्हाधिकारीविधानसभा निवडणूक 2019