Join us

स्वच्छ विद्यालयांसाठी राज्यातील मुख्याध्यापकांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 4:32 AM

केंद्र सरकाच्या मदतीने देशातील सर्व शाळांसाठी शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्न जीवनाचा लाभ मिळावा आणि स्वच्छ शाळांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून शाळांसाठी ‘स्वच्छ विद्यालय’ हा पुरस्कार सुरू करण्यात आला.

मुंबई : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी आता शाळेतील मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्याचे आयोजन महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाद्वारे करण्यात आले आहे. केंद्र सरकाच्या मदतीने देशातील सर्व शाळांसाठी शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्न जीवनाचा लाभ मिळावा आणि स्वच्छ शाळांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून शाळांसाठी ‘स्वच्छ विद्यालय’ हा पुरस्कार सुरू करण्यात आला. याबाबतच्या मार्गदर्शन सूचना, शाळांसाठी नामनिर्देशन करताना आवश्यक असलेली प्रश्नावली केंद्राकडून करण्यात आली आहे. या संदर्भात हे प्रशिक्षण असणार आहे.शाळांच्या या बाह्य मूल्यांकनासाठी राज्यभरातील ७० मुख्याध्यापकांची निवड केली आहे. त्याचे प्रशिक्षण २७ आणि २८ एप्रिल रोजी पुण्यात होणार आहे. राष्ट्रीय पातळीवर १०० शाळा, राज्य पातळीवर ४० शाळा आणि जिल्हा पातळीवर ४८ शाळा यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे, यासाठी शाळांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. या प्रशिक्षणात ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ पोर्टलवर माहिती भरणे या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. प्रशिक्षणाच्या दुसºया दिवशी स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शाळेला भेट दिली जाणार आहे. या भेटीचे नियोजन युनिसेफ वॉश यांच्याकडून करण्यात येणार असल्याची माहिती संचालक डॉ. सुनील मगर यांनी पत्रकातून दिली आहे.शाळांमध्ये पाण्याची उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्यासाठीची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, वर्तणूक बदल व क्षमता विकास अशा ५ क्षेत्रांमध्ये एकूण ३९ घटक निश्चित केले आहेत.

टॅग्स :शैक्षणिक