Join us

कृषी विज्ञान केंद्र बनलेय प्रशिक्षण हब

By admin | Published: October 29, 2015 12:17 AM

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती उद्योगात आलेल्या अनिश्चिततेने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत त्यांना बळ देण्याचे काम मुक्त विद्यापीठासोबत आत्मा

मुंबई : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती उद्योगात आलेल्या अनिश्चिततेने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत त्यांना बळ देण्याचे काम मुक्त विद्यापीठासोबत आत्मा आणि महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाच्या सहयोगाने करण्यात येत आहे. शेतकरी वर्गाला सक्षम बनविणारे हे कृषी विज्ञान केंद्र आता कात टाकू लागले असून, ते राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण हब बनले आहे.कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांमार्फत गेल्या दोन वर्षांपासून हरितगृह तंत्रज्ञान व निर्यातक्षम उत्पादन, भाजीपाला काढणी, हाताळणी व प्रक्रिया, परदेशी भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान व डाळिंब काढणी व प्रक्रिया अशा विषयांवर शेतकऱ्यांना ५ दिवसांची प्रशिक्षणे दिली जात आहेत. भाजीपाला उत्पादनाच्या सुधारित तंत्रज्ञानासोबतच, शास्त्रीय पद्धतीने काढणी, हाताळणी, प्रतवारी व पॅकिंग व प्रक्रियायुक्त पदार्थांवर माहिती दिली जात आहे. हरितगृह उभारणी, हरितगृहातील सिंचन, माध्यम तयार करणे, वातावरण नियंत्रणाचे तंत्र, महत्त्वाची पिके व त्यांचे शास्त्रीय व्यवस्थापन, महत्त्वाच्या कीड-रोगांचे व्यवस्थापन, काढणी, हाताळणी, प्रतवारी, पॅकिंग, मालाची विक्रीव्यवस्था यासोबतच अनुदानासाठी प्रकल्प तयार करणे अशा महत्त्वाच्या विषयांवर प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत १७ प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून सुमारे चारशेहून अधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. (प्रतिनिधी)