लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी १०० हून अधिक कान, नाक, घसा तज्ज्ञांना प्रशिक्षित करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. या माध्यमातून ब्लॅक फंगसच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सोप्या पद्धतीने करणे सोपे हाेईल.
राज्याच्या कोरोना टास्क फोर्सने रुग्णांसाठी ऑक्सिजनचा वापर करताना निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याचा वापर करावा, अशा सूचनाही वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या आहेत. हा आजार सातत्याने वाढत असल्याने नुकतीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याविषयी तज्ज्ञांशी चर्चा केली. या बैठकीत ठाण्यातील डॉ. आशिष भूमकर यांनी राज्यातील वैद्यकीय तज्ज्ञांना या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याची तयारी दाखवली आहे, ब्लॅक फंगस झालेल्या भागावर शस्त्रक्रिया केल्यानंतर फिजिशियनच्या साहाय्याने पुढील उपचार देणे सोपे होते.
डॉ. भूमकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले, ही बुरशी शरीरात नाकातून डोळे, मेंदू अशी पसरते. त्याचे निदान सिटीस्कॅन किंवा इतर चाचणीतून होत नाही. एमआरआयद्वारे याचे निदान करणे सोपे होते. लवकर निदान झाल्यास आजार आटोक्यात आणता येतो, टास्क फोर्सचे मदतीने पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत या आजारावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू९ आहेत.
राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, कोरोना उपचारांदरम्यान स्टिरॉइड्सचा अतिवापर केल्यामुळे हा आजार बळावण्याचा धोका असतो. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्टिरॉइड्सच्या वापराकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे, त्याकरिता स्थानिक पातळीवर सर्व तज्ज्ञांना सूचना देण्यात आल्या आहेत.
..........................