कोरोना लसीकरणासाठी महापालिकेमार्फत रंगीत तालीम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 07:29 PM2021-01-08T19:29:34+5:302021-01-08T19:30:35+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लसीकरण केंद्रात 'ड्राय रन' मोहिमेचा आरंभ महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी झाला.

training by the municipality for corona vaccination | कोरोना लसीकरणासाठी महापालिकेमार्फत रंगीत तालीम

कोरोना लसीकरणासाठी महापालिकेमार्फत रंगीत तालीम

Next

मुंबई - वांद्रे -कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड समर्पित रुग्णालयात शुक्रवारी कोरोना लसीकरणाची ड्राय रन मोहीम सुरु करण्यात आली. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था असलेल्या जागेत आता लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. वांद्रे - कुर्लाव्यतिरिक्त विले पार्लेचे कूपर रुग्णालय आणि घाटकोपर राजावाडी रुग्णालयातही लसीकरण केंद्रांमध्ये रंगीत तालीम करण्यात आली. पालिकेने लसीकरणासाठी आठ केंद्र तयार ठेवली आहेत. दररोज ५० हजार लोकांना लस देण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. 

कोरोना लसीकरण केंद्रात 'ड्राय रन' मोहिमेचा आरंभ महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी झाला. यावेळी सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा प्रवीणा मोरजकर, केंद्र शासनाचे प्रतिनिधी डॉ. सुधीर वंजे, बीकेसी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. राजेश डेरे उपस्थित होते. केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्युटच्या ‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या वापरासाठी नुकतीच परवानगी दिली. या पार्श्वभूमीवर पालिकेने लसीकरणासाठी ७६२ मास्टर ट्रेनर व अडीच हजार कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले आहे. हे लसीकरण पाच टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि दीर्घ आजार असणार्‍या लोकांना लस देण्यात येणार आहे. त्यापूर्वी लसीकरणाची रंगीत तालीम मुंबईत तीन ठिकाणी शुक्रवारी पार पडली. 

‘बीकेसी’ कोविड सेंटरमध्ये आत व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असणार आहेत. पार्किंग आणि ७० माणसांसाठी प्रतिक्षालय, आठ नोंदणी कक्ष, ५० माणसांसाठी निरीक्षण केंद्र आणि आपत्कालीन स्थितीसाठी आयसीयू बेड, तज्ज्ञ डॉक्टर तैनात ठेवण्यात  आले आहेत. तसेच लसीकरणानंतर अ‍ॅलर्जी, ताप, उलटी यासारखे प्रकार घडल्यास डॉक्टरांशी संपर्क साधता येणार आहे. कूपर रुग्णालयात  ४० डॉक्सर्ट-परिचारिका, २५ आरोग्य कर्मचार्‍यांना प्रक्षिक्षण देण्यात आले आहे. तर राजावाडी रुग्णालयात पाच बूथ तयार करण्यास परवानगी मिळाली असून प्रत्येक बुथवर दोनशे या प्रमाणे दररोज एक हजार लोकांना लस देण्यात येणार आहे. 

असे होईल लसीकरण... 

लसीकरणासाठी नोंदणी केल्यानंतर मोबाईलवर ‘एसएमएस’ येईल. लसीकरण केंद्रावर आल्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून ओळख पटवून आलेला ‘एसएमएस’, ओळखपत्र तपासणी केल्यानंतर टोकन नंबर देण्यात येणार आहे. यानंतर प्रतिक्षा कक्षात बसवून टोकन नंबर आल्यावर लसीकरण कक्षात पाठवण्यात येईल. या ठिकाणी अ‍ॅपवर लाभार्थ्याची संपूर्ण माहिती भरल्यानंतर प्रशिक्षित नर्स-आरोग्य कर्मचार्‍याकडून लसीकरण केले जाईल. लसीकरणानंतर अर्धा तास प्रतीक्षा कक्षात डॉक्टर-आरोग्य कर्मचार्‍यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल.  अर्धा तास काहीच तक्रार नसल्यास संबंधित व्यक्तीला घरी सोडण्यात येणार आहे. मात्र लसीकरणादरम्यान कोणताही त्रास जाणवल्यास खबरदारी म्हणून सेंटरवरच आवश्यक डॉक्टर, बेड तैनात ठेवण्यात येतील.

Web Title: training by the municipality for corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.