लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील तरुणांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याच्या अनुषंगाने आयटीआयचे आधुनिकीकरणासाठी सुरू असलेल्या उपक्रमाचे कौतुक करतानाच आयटीआयमध्ये मुलांना काळाशी सुसंगत तसेच नव्या उद्योगांची आवश्यकता पाहून प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
आयटीआयचे अद्ययावतीकरण करणे तसेच कोकणाचा पर्यावरणपूरक विकास करण्यासाठी ‘कोकण फ्युचर पार्क’सारखे उपक्रम राबविण्याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील आदी उपस्थित होते.
टाटा टेक्नॉलॉजी आणि इतर कॉर्पोरेट संस्थांच्या सहयोगातून राज्यातील ४१९ शासकीय आयटीआय आणि ५३ टेक्निकल स्कूल्सचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या संस्थांमध्ये जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान तसेच आधुनिक कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १० हजार ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, यापैकी सुमारे ८२ टक्के निधी हा कॉर्पोरेट संस्थांच्या माध्यमातून तर १२ टक्के निधी हा राज्य शासनामार्फत खर्च केला जाणार आहे. कौशल्य विकास विभाग आणि विविध कॉर्पोरेट्स यांच्या पुढाकाराने हाती घेतलेल्या या उपक्रमाचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच कोकण फ्युचर पार्कबाबत सादरीकरण करण्यात आले. हा उपक्रम कोकणाच्या पर्यावरणपूरक विकासाला चालना देणारा ठरू शकेल. याबाबत कोकणातील स्थानिक लोक आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांना सोबत घेऊन अजून काम करण्यात यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
यावेळी अजित पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काकोडकर, नवाब मलिक यांच्यासह सुभाष देसाई, दादाजी भुसे, आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे यांनीही विविध सूचना मांडून हे दोन्ही उपक्रम गतिमान करण्यात यावेत, असे सांगितले.