मुंबई : मुंबई विद्यापीठाने सहायक कुलसचिव, उपकुलसचिव व सक्षम अधिकारी यांच्यासाठी प्रशासकीय कामकाजाच्या मार्गदर्शनार्थ ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी या दोन दिवशी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. ते रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये झाले. मात्र या प्रशिक्षणावर काँग्रेस आणि मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्यांनी आक्षेप घेतल्याने ते वादाच्या भोवºयात सापडले आहे. सोबतच सिनेट सदस्यांनी कुलगुरूंना निवेदन देऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
प्रबोधिनीमार्फत प्रथम टप्प्यात भार्इंदर पश्चिमेकडील उत्तन येथे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी विद्यापीठाने ३० अधिकाऱ्यांची निवड केली असून, विद्यापीठातील अधिकाºयांनी शुक्रवारी या प्रशिक्षणाला हजेरी लावली. ३० अधिकाºयांच्या प्रशिक्षणासाठी, वास्तव्याची व्यवस्था, प्रशिक्षण कीट आदींसाठी एक लाख ९८ हजार ९४८ रुपये प्रबोधिनीकडून आकारण्यात येणार असल्याची माहिती सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली. या प्रशिक्षणापूर्वी विद्यापीठाने ५० टक्के रक्कम प्रबोधिनीकडे जमा केली आहे. उर्वरित रक्कम सात दिवसांच्या आत विद्यापीठाकडे जमा करावी लागणार आहे.
या शिबिरात शासनाशी पत्रव्यवहार, अंतर्गत टिप्पणी, परिपत्रक काढणे, विद्यापीठ कायदा व नियम, माहितीचा अधिकार आणि विधिमंडळातील प्रश्न हाताळणे, निर्णयक्षमता व नेतृत्वविकास, मनुष्यबळ व्यवस्थापन व टीम वर्क, प्रशासन कुशलता आणि परस्पर संवाद कौशल्ये आदी विषयांची माहिती अधिकाºयांना देण्यात येणार आहे. मात्र प्रबोधिनी ही संघ, एका विशिष्ट पक्षाच्या विचारसरणीनुसार कार्यरत असल्याने, तसेच अनुभव नसताना विद्यापीठातील अधिकाºयांना त्यांनी प्रशिक्षण कसे देऊ शकतात, असा सवाल विद्यापीठ सिनेट सदस्यप्रदीप सावंत यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेसचे राजीव सातव यांनीही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार केली आहे. यानंतर आता सिनेट सदस्यांनी विद्यापीठात झालेल्या या प्रकाराची जबाबदारी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी घ्यावी आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडे प्रशिक्षण देण्याबाबत अनुभव नाही. तसेच, ही संस्था संघ, भाजपसंबंधी विचारधारेची असल्याने प्रशिक्षणात राजकारण येऊ नये, अशी माझी भूमिका आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण तातडीने बंद करावे, अशी मागणी सातव यांनी ट्विटरच्या माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.