दोन फोटो मेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरच्या अपघातांमध्ये वाढ झाल्यामुळे जीवितहानी, वितहानी होते. हे टाळण्यासाठी रासायनिक कारखान्यातील सुरक्षा अधिकारी, पर्यवेक्षक व उत्पादन व्यवस्थापक यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले.
परळ येथील नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था येथे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कामगार विभागा यांच्यामार्फत या ॲक्टसेफ-२०२१ रिॲक्टर सुरक्षितता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे कामगार आयुक्त व संचालक डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. या वेळी कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश तथा बच्चू कडू, प्रधान सचिव विनिता वेद सिंगल आणि डॉ. महेंद्र कल्याणकर उपस्थित होते.
मागच्या वर्षी रसायनिक कारखान्यांमध्ये वाढलेल्या अपघातांमुळे औद्योगिक सुरक्षा संचालनालयामार्फत तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ऑपरेटर्स/ सुपरवायझर्स यांच्यासाठी विविध महत्त्वाच्या विषयांवर ३ दिवसीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. केम सेफ्टी या कार्यशाळेचे समन्वय ठाणे येथील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य उपसंचालक विक्रम काटमवार यांनी केले होते. महाराष्ट्रातील विविध विभागांमधून ऑपरेटर्स/सुपरवायझर्स यांच्यासाठी एकूण १८ विभागीय प्रत्येकी ३ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्या ९८६ ऑपरेटर्स/सुपरवायझर्स यांना प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र देण्यात आले.
* अपघात टाळण्यासाठी मदत
सुरक्षा अधिकारी, पर्यवेक्षक व प्रॉडक्शन मॅनेजर यांनी कारखान्यात जाऊन इतर कामगारांना रिॲक्टर सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण दिल्यास अपघात टाळण्यासाठी मदत होईल. शून्य अपघात उद्दिष्ट साध्य होईल.
- डॉ. महेंद्र कल्याणकर, संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र
----------------------
फोटो ओळ : ॲक्टसेफ - २०२१ रिॲक्टर सुरक्षितता कार्यशाळेत कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. या वेळी सोबत कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश तथा बच्चू कडू.