लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संक्रमणाच्या दीर्घकाळानंतर आता कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरच राज्यासह मुंबईतही लसीकरण सुरू हाेईल. मुंबई महापालिकेकडे लसीकरणाविषयी ब्ल्यू प्रिंट तयार असून यासाठी दहा विशेषज्ञांची टीम तयार कऱण्यात आली आहे. याशिवाय लसीचा साठा, वाहतूक आणि लसीचा साठा हँडल करण्यासाठी सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. या प्रक्रियेला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या टप्प्यात केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयात लसीचा साठा करण्यात येईल.
शहर-उपनगरात ६० लाख लसींचा साठा कऱण्यात येणार आहे. याशिवाय, आवश्यकता भासल्यास पालिका रुग्णालयातील त्वचा, रक्त आणि दुग्धपेढींमध्ये या लसींचा साठा कऱण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. कांजुरमार्ग येथील पालिकेच्या पाच मजली इमारतीमध्ये लसीचा साठा कऱण्यात येणार आहे. त्यासाठी या ठिकाणी विशेष कोल्ड स्टोरेजची सोय करण्यात आली आहे.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, पालिकेच्या रुग्णालयांसह वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून चार हजार लसींचा साठा करण्यात येईल. लसींचा साठा करण्यासाठी २ ते ८ डिग्री तापमान आवश्यक आहे. मुंबईत सुरुवातीच्या टप्प्यात २५ हजार आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि अतिजोखमीचे आजार या गटातील व्यक्तींना लस देण्यात येईल. याशिवाय, प्रशाासनातर्फे स्टोरेजसाठी मोठ्या प्रमाणात पर्याय शोधण्यात येत आहेत, त्या उपलब्धतेची पूर्तता झाल्यास लसीकरण प्रक्रियेला आणखी वेग येईल.