नॅक मूल्यांकनासाठी आता मुंबई विद्यापीठातर्फे प्रशिक्षण कार्यशाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 06:27 AM2018-10-21T06:27:34+5:302018-10-21T06:27:40+5:30
राज्यातील सर्वच महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करून घेण्याचे बंधन घातले असतानाही, राज्यातील अनेक महाविद्यालयांचे अद्याप एकदाही नॅक मूल्यांकन झालेले नाही.
सीमा महांगडे
मुंबई : राज्यातील सर्वच महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करून घेण्याचे बंधन घातले असतानाही, राज्यातील अनेक महाविद्यालयांचे अद्याप एकदाही नॅक मूल्यांकन झालेले नाही. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी हे मूल्यांकन करावे, यासाठी येत्या २२ ते २४ आॅक्टोबर दरम्यान मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये महाविद्यालयांच्या नॅक मूल्यांकनसंदर्भात समुपदेशन (काउन्सिलिंग) करण्यात येणार आहे. रुसा (उच्चस्तर शिक्षा अभियान) आणि मुंबई विद्यापीठाचा इंटर्नल क्वालिटी असिस्टंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
प्रशिक्षण कार्यशाळेचा पहिला टप्पा मुंबई विभागातील महाविद्यालयांसाठी असून, त्यानंतर डिसेंबर महिन्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग महाविद्यालयांसाठी हा टप्पा राबविण्यात येईल. येथील शासकीय व खासगी अशा सर्वच महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती समितीकडून (नॅक) तपासणी करून घेण्याचे बंधन विद्यापीठ अनुदान आयोगाने घातले आहे. नॅकच्या तज्ज्ञ समितीमार्फत अध्यापन दर्जा, संशोधन गुणवत्ता, शैक्षणिक सुविधा, निकालांचे प्रमाण, विद्यार्थ्यांकडून मिळणारा प्रतिसाद, शिक्षणाचा दृष्टिकोन या सर्व बाबींची तपासणी करण्यात येते. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतरच महाविद्यालयांना मानांकन जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने या संदर्भात पुढाकार घेऊन महाविद्यालयांना या कार्यशाळेचे प्रशिक्षण घेण्यासाठी आवाहन केले आहे.
मुंबई विद्यापीठात एकूण ७९१ महाविद्यालये असून, त्यातील २७३ महाविद्यालयांनीच नॅक मूल्यांकन केले आहे. म्हणजेच अद्याप फक्त ३४.५ टक्के महाविद्यालयांनीच मूल्यांकन करून घेतले आहे. मात्र, नॅक मूल्यांकन झालेल्या महाविद्यालयांपैकी एकूण ११६ महाविद्यालयांना अ श्रेणी प्राप्त झाली आहे. राज्यात अ श्रेणी प्राप्त असलेल्या सगळ्यात जास्त महाविद्यालयांची संख्या मुंबई विद्यापीठाकडे आहे. या संख्येत आणखी भर पडावी आणि अधिकाधिक महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून आपली गुणवत्ता वाढवावी, असा हेतू या कार्यशाळेचा असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
>ंपारदर्शकतेत वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत
नॅक मूल्यांकन प्रणालीमध्ये या वेळी बदल करण्यात आले असून, आता ७० टक्के संख्यात्मक विश्लेषण, २५ टक्के तज्ज्ञ समितीकडून केली जाणारी पाहणी आणि ५ टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून घेतला जाणार आढावा याचा समावेश असणार आहे. त्यामुळे नॅक मूल्यांकन प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता आल्याची माहिती तज्ज्ञ समितीकडून देण्यात आली आहे.