Join us

भाईंदर-विरार लोकल सेवा अत्यंत संथगतीनं सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 7:11 AM

अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द

मुंबई: काल दिवसभर कोसळत असलेल्या पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे. भाईंदर ते विरार दरम्यानची वाहतूक अतिशय संथगतीनं सुरू आहे. 24 तासांनंतर ही वाहतूक सुरू झाली आहे. वसई-विरार दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं कालपासून सर्व लोकल भाईंदरपर्यंतच येत होत्या. मात्र आता भाईंदर ते विरार लोकस सेवादेखील हळूहळू पूर्ववत होत आहे. रुळांवरील पाण्याचा निचरा करण्याचं काम सध्या सुरू असून त्यामुळे लोकल 10 किलोमीटर प्रतितास वेगानं धावत आहेत.वसई-विरार दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं सर्व लोकल काल भाईंदरपर्यंतच जात होत्या. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मात्र 24 तासांनंतर या मार्गावर वाहतूक सुरू झाली आहे. मात्र ती अतिशय संथगतीनं सुरू आहे. याशिवाय लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम झाला आहे. सकाळी वलसाड-मुंबई सेंट्रल पॅसेंजर, फ्लाईंग राणी, डहाणू-पनवेल, डहाणू- बोरीवली, विरार-संजान, विरार-भरुच शटल, सौराष्ट्र एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र आता हळूहळू लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील धावू लागल्या आहेत.

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत असली, तरी मध्य आणि हार्बरची वाहतूक सुरळीत आहे. रात्रभर पावसानं विश्रांती घेतल्यानं मध्य आणि हार्बरवरील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये रात्रभर पाऊस झालेला नाही. त्यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत आहे. 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमुंबईपाऊसवसई विरारभाइंदर