नवी मुंबई : हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी टर्मिनलकडे जाणाऱ्या ट्रेनने सानपाड्याजवळ तीन म्हशींना धडक दिली. यात एक म्हैस जागीच ठार झाली असून अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक १५ मिनिटे थांबविण्यात आली होती. सानपाडा रेल्वेस्टेशनजवळील गवतामध्ये आज १३ म्हशी चरत होत्या. काही म्हशी रेल्वे ट्रॅकवर उभ्या होत्या. अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे रेल्वेच्या गँगमननी त्यांना तेथून हाकलण्यास सुरुवात केली. परंतु तीन म्हशी सीएसटीकडे जाणाऱ्या ट्रॅकवर गेल्या. ११.५२ च्या दरम्यान आलेल्या ट्रेनने त्यांना धडक दिली. या अपघातामध्ये एक म्हैस जागीच ठार झाली आहे. दुसऱ्या दोन धडकेने बाजूला जावून पडल्या. या अपघातानंतर १५ मिनिटे वाहतूक ठप्प होती. रेल्वेचे कर्मचारी, पोलीस, स्वयंसेवक, महापालिकेच्या वाशी कोंडवाड्यातील कर्मचाऱ्यांनी जखमी व मृत म्हशींना बाजूला काढले. जवळपास तीन तास त्यांना वाचविण्यासाठी धडपड सुरू होती. जखमी झालेल्या म्हशींना कोंडवाड्यात उपचारासाठी नेण्यात आले आहे. या अपघातामुळे सानपाडा रेल्वे स्टेशनजवळ बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. जखमी म्हशींना ट्रॅकवरून बाजूला काढण्यासाठी पुरेशी साधने नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी वाशी रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. म्हशी ट्रॅकवर चरण्यासाठी सोडणाऱ्या मालकाचाही पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
हार्बर मार्गावर ट्रेनची म्हशींना धडक
By admin | Published: July 18, 2014 12:19 AM