ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प वेळेपूर्वीच पूर्ण होणार; पर्यावरणासह फ्लेमिंगो पक्ष्यांना हानी पोहोचणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 04:55 AM2020-01-16T04:55:04+5:302020-01-16T04:55:13+5:30

वन विभाग, सिडको, रेल्वे, बीएआरसी, एएसआय इत्यादी विविध एजन्सींकडून सर्व पूर्वपरवानग्या मिळाल्या आहेत. आम्ही प्रकल्प वेळेतच पूर्ण करीत आहोत याचा आम्हाला आनंद आहे.

The Trans Harbor Link project will be completed ahead of time | ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प वेळेपूर्वीच पूर्ण होणार; पर्यावरणासह फ्लेमिंगो पक्ष्यांना हानी पोहोचणार नाही

ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प वेळेपूर्वीच पूर्ण होणार; पर्यावरणासह फ्लेमिंगो पक्ष्यांना हानी पोहोचणार नाही

Next

मुंबई : मुंबई-नवी मुंबईला जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून वेळेपूर्वीच तो पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. देशातील समुद्रावरील सर्वांत जास्त लांबी असणाऱ्या मुंबई-पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) पुलाच्या पहिल्या गाळा उभारणी कामाचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. दरम्यान, हा प्रकल्प सप्टेंबर २०२२पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, या प्रकल्पामुळे पर्यावरणाची विशेषत: येथे स्थलांतरित होत असलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांना हानी पोहोचणार नाही, याची विशेष काळजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून घेण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कळ दाबून गर्डरच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी ठाकरे म्हणाले, या प्रकल्पासाठीचा कालावधी ५४ महिन्यांचा आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ही नवी मुंबईला जोडली जाईल. राज्यातील नव्हे, तर देशातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाºया सुमारे २२ किलोमीटर लांबीच्या ६ पदरी (३+३ मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे. या पुलाची समुद्रातील लांबी १६.५ किलोमीटर आहे. जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किलोमीटर आहे.
या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील शिवाजीनगर व राष्ट्रीय महामार्ग-४बवर चिर्ले गावाजवळ इंटरचेंजेस आहेत. भारतातील सर्वांत जास्त लांबीचा हा समुद्रावरील पूल ठरणार आहे.

प्रकल्पाची सद्यस्थिती
प्रकल्प जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेच्या कर्ज साहाय्याने राबविण्यात येत आहे.
प्रकल्पाचे बांधकाम हे ३ स्थापत्य कंत्राटद्वारे व १ इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम कंत्राटाद्वारे करण्यात येणार आहे.
प्रकल्पाच्या ३ पॅकेजेस्च्या कंत्राटदारांना २३ मार्च २०१८ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
प्रकल्पाची डिसेंबर २०१९ अखेर सुमारे १९ टक्के आर्थिक प्रगती झाली आहे.
पुलाच्या पायाचे व स्तंभांच्या उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे.
सेगमेंट कास्टिंग आणि तात्पुरत्या पुलाच्या उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे.
प्रकल्पाचा बांधकाम कालावधी सुमारे साडेचार वर्षे आहे.
प्रकल्प सप्टेंबर २०२२पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
दक्षिण मुंबई ते नवी मुंबई दरम्यानची प्रवासाची वेळ अडीच ते तीन तासांनी कमी होईल.

वन विभाग, सिडको, रेल्वे, बीएआरसी, एएसआय इत्यादी विविध एजन्सींकडून सर्व पूर्वपरवानग्या मिळाल्या आहेत. आम्ही प्रकल्प वेळेतच पूर्ण करीत आहोत याचा आम्हाला आनंद आहे. प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही; विशेषत: फ्लेमिंगो पक्ष्यांना फटका बसणार नाही याची आम्ही विशेष काळजी घेत आहोत. - आर.ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

Web Title: The Trans Harbor Link project will be completed ahead of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.