लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई आता एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार झाली असून, मुंबई बेटाची थेट जोडणी आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंकद्वारे नवी मुंबई येथील मुख्य भूमीशी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी त्यांना विनंती करणार आहोत. नोव्हेंबर-डिसेंबरअखेर ट्रान्स हार्बर लिंक वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक खूप महत्त्वाचा आहे. यामुळे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हे जोडले जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाला हा रस्ता जोडला जात आहे, असे शिंदे म्हणाले.फडणवीस म्हणाले की, आज आनंदाचा दिवस आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जोडला गेला आहे. नोव्हेंबर महिन्यात हा खुला होईल. हा केवळ पूल नाही. या पुलामुळे आर्थिक बाजू बळकट होईल. कारण मुंबईमधून २० मिनिटांत नवी मुंबईत जाता येणार आहे. नवी मुंबई विमानतळ गाठता येणार आहे. ३० वर्षे या पुलाची चर्चा होती. मोदी सरकारमुळे हे काम शक्य झाले आहे. फ्लेमिंगो पक्ष्यांना प्रकल्पामुळे काही त्रास होणार नाही याचा विशेष आनंद आहे. आता येथून नरिमन पॉइंटकडे जाण्यासाठी भुयारी मार्गाचे काम केले जाणार आहे. इस्टर्न फ्री वे सोबत त्याची जोडणी असेल. त्यामुळे पुढील प्रवासही उत्तम होईल. कार्यक्रमाच्या सरतेशेवटी केलेल्या नेत्रदीपक रोषणाईमुळे येथील आसमंत उजळून निघाला होता.
अडचणींवर मातमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास म्हणाले की, हा प्रकल्प पूर्ण करत असताना खूप अडचणी आल्या. भरती आणि ओहोटी ही आव्हाने होती. पर्यावरण मंजुरी मिळविताना खूप मेहनत करावी लागली. येथे ओपन टोल सिस्टीम असणार आहे. त्यामुळे वाहनांना थांबावे लागणार नाही. यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हा पूल आपण वाहतुकीसाठी खुला करू.