मुंबई : मुंबई आता एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार झाली असून, मुंबई बेटाची थेट जोडणी आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंकद्वारे नवी मुंबई येथील मुख्यभूमीशी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी आपण त्यांना विनंती करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक खूप महत्वाचा आहे. यामुळे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हे जोडले जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाला हा रस्ता जोडला जात आहे. हा प्रकल्प विकास घेऊन येईल, असा विश्वास देखील एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी केली; त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आनंदाचा दिवस आहे. कारण मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जोडला गेला आहे. नोव्हेंबर महिन्यात हा खुला होईल. हा केवळ ब्रीज नाही. या ब्रीजमुळे आर्थिक बाजू बळकट होईल. कारण मुंबईमधून २० मिनिटांत नवी मुंबईत जाता येणार आहे. नवी मुंबई विमानतळ गाठता येणार आहे. ३० वर्ष या पुलाची चर्चा होती. मोदी सरकारमुळे हे काम शक्य झाले आहे. फ्लेमिंगो पक्षी यांना प्रकल्पामुळे काही त्रास होणार नाही याचा विशेष आनंद आहे. आता येथून नरिमन पॉइंटकडे जाण्यासाठी भुयारी मार्गाचे काम केले जाणार आहे. इस्टर्न फ्री वे सोबत त्याची जोडणी असेल. त्यामुळे पुढील प्रवास देखील उत्तम होईल.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास म्हणाले की हा प्रकल्प पूर्ण करत असताना खूप अडचणी आल्या. भरती आणि ओहोटी ही आव्हाने होती. पर्यावरण मंजुरी मिळविताना खूप मेहनत करावी लागली. आता जे काम होते आहे त्यामुळे फ्लेमिंगो पक्षी यांना काही त्रास होत नाही यांचा आनंद होत आहे. येथे ओपन टोल सिस्टीम असणार आहे. त्यामुळे वाहनांना थांबावे लागणार नाही. यावर्षी नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये हा पूल आपण वाहतुकीसाठी खुला करू.
डबल डेकर बसमधून यावेळी छोटी फेरी पूलावर आयोजित करण्यात आली होती. या बसच्या वरच्या डेकमध्ये कर्मचारी उपस्थित होते. तिरंगा हाती घेऊन त्यांनी उपस्थित त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सरते शेवटी करण्यात आलेल्या नेत्र दीपक रोषणाईमुळे येथील आसमांत उजळून निघाला होता.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकएकूण लांंबी : २२ किमीलेन : ३ अधिक ३ अधिक
इंटरचेंज१) मुंबईच्या बाजुने शिवडी२) नवी मुंबईच्या बाजुने शिवाजी नगर व चिर्ले
- पॅकेज एक : ० ते १०.३८० किमी
- पॅकेज दोन : १०.३८० ते १८.१८७ किमी
- पॅकेज तीन : १८.१८७ ते २१.८०० किमी
- पॅकेज चार : इंटेलिंजट ट्रान्सपोर्ट सिस्टीम
- पॅकेज एक : एल अँड टी - ७ हजार ६३७ कोटी
- पॅकेज दोन : डीएईडब्ल्यूओओई अँड सी - टाटा प्रकल्प जेव्ही - ५ हजार ६१२ कोटी
- पॅकेज तीन : एल अँड टी - १ हजार १३ कोटी
- १६.५ किलोमीटर सागरी पूल आहे.- ५.५ किलोमीटर पूल जमीनीवर- नवी मुंबई विमानतळालाही हा मार्ग जोडला जाणार- फ्लेमिंगोसाठी साऊंड बॅरिअर- जपानच्या कंपनीचे ऑर्थोट्रॉपिक तंत्रज्ञान - ६ हजार कामगार आहेत.
महापालिका बांधत असलेला कोस्टल रोड आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरण बांधत असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण झाल्यानंतर वरळी-शिवडी कनेक्टर खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ९४ टक्के पेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून यावर्षी नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला करण्यात येईल. पर्यावरणपूरक असा हा सागरी महामार्ग असून बांधकामातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून त्याचे काम करण्यात आले असून या महामार्गावर टोल भरण्यासाठी थांबण्याची आवश्यकता नसणार आहे.