Join us

वीज बिलांच्या तक्रारीवर आता ऑटोमॅटीक मीटर रिडींगचा उतारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 4:29 PM

२ कोटी ३० लाख ग्राहकांपैकी केवळ २ लाख ६५ हजार वीजग्राहकांनी स्वतःहून मीटर रिडींग पाठविले

मुंबई : जून महिन्यात आलेल्या वीज बिलांनी ग्राहकांना घाम फोडला आहे. ५ हजारांपासून ११ हजारांपर्यंत आलेल्या  बिलांमुळे वीज ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अशा परिस्थिती वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, बेस्ट, टाटा आणि अदानी या चारही वीज कंपन्यांना निर्देश दिले असून, ऑटोमॅटीक मीटर रिडींगला प्रोत्साहन दिले आहे. अशा प्रकाराचे मीटर बसविले की वीज बिलांच्या तक्रारीमध्ये मोठया प्रमाणावर घट होईल, असा दावा केला जात आहे.जेथे मीटर्सना ऑटोमॅटीक मीटर रिडींग लावण्यात आले आहे; तेथे लॉकडाऊनच्या काळात वितरण परवानाधारकांना प्रत्यक्ष मीटरमधील नोंदीच्या आधारावर वीज बिल देणे शक्य झाले. लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष मीटरमधील नोंदीच्या आधारावर वीज बील आकारण्यात आलेल्या ग्राहकांच्या संख्येचा विचार करता महावितरणच्या वीज ग्राहकांची संख्या ६ लाख ११ हजार ५३७ आहे. बेस्टची १९३, अदानी ५७० आणि टाटा पावरच्या वीज ग्राहकांची संख्या २३ हजार ४४७ आहे. ऑटोमॅटीक मीटर रिडींग बसविलेल्या वीज ग्राहकांचा आकडा तुलनेने कमी आहे. मात्र असे मीटर बसविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. अशा मीटर्समुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय मीटरमधील अचूक नोंदी घेण्यास मदत होईल. आणि तक्रारीमध्ये घट होईल.दरम्यान, कोरोना विषाणूमुळे राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे महावितरणकडून मीटर रिडींग, वीजबिल वितरण व बिल भरणा केंद्र बंद करण्यात आले होते. रिडींग बंद झाल्यामुळे राज्यातील लघुदाब ग्राहकांना सरासरी वीजबिल देण्यात आले. तसेच वेबपोर्टल व मोबाईल अॅपद्वारे मीटरचे रिंडीग पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये २ कोटी ३० लाख ग्राहकांपैकी केवळ २ लाख ६५ हजार वीजग्राहकांनी स्वतःहून मीटर रिडींग पाठविले. त्याप्रमाणे त्यांना वीजवापराचे अचूक मासिक वीजबिल देण्यात येत आहे. उर्वरित वीजग्राहकांना पाठविण्यात आलेली सरासरी वीजबिले दुरुस्त करण्यासाठी रिडींग घेणे आवश्यक होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १ जूनपासून स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागात मीटर रिडींग, वीजबिल वितरण व बिल भरणा केंद्र सुरु करण्यात आले आहे. मीटर रिडींग प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर वीजग्राहकांना लॉकडाऊन कालावधीमधील एप्रिल व मेसह जून महिन्याचे वीजबिल एकत्रित पाठविण्यात येत आहे. 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉकमहाराष्ट्र