Join us

आयुक्त चहल, अतिरिक्त आयुक्त भिडे यांची बदली करा! निवडणूक आयोगाचे सरकारला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 8:23 AM

निवडणुकांआधी आयोगाकडून राज्यातील अधिकाऱ्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला जातो.

मनोज मोघे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व पी. वेलारासू यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला तरी अद्याप त्यांची बदली झालेली नाही. याबाबत राज्याचे माजी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी राज्य सरकारला पत्र पाठविल्यानंतर काही दिवसात देशपांडे यांचीच बदली झाली. त्यामुळे चर्चांना तोंड फुटले असतानाच नवे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम आल्यानंतर पुन्हा एकदा या बदल्यांसंदर्भात पत्राद्वारे राज्य सरकारला आठवण करून देण्यात आली आहे. त्यामुळे सरकार आता काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले.

निवडणुकांआधी आयोगाकडून राज्यातील अधिकाऱ्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला जातो. त्यानुसार निवडणूक आयोगाने राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला पत्र पाठविले असून, तीन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्यांची यादीच मागवली आहे. सरकारकडून चहल, भिडे, वेलारासू यांचा थेट निवडणूक प्रक्रियेशी सहभाग नसल्याने त्यांना बदलीच्या निकषातून वगळले पाहिजे, असे मागील वेळी कळविण्यात आले होते.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तीन वर्षांपेक्षा अधिककाळ काेणत्याही अधिकाऱ्याला एका जागी नियुक्ती देता येत नसल्याने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला या गोष्टीची आठवण करून दिली आहे.

राज्य सरकार काय निर्णय घेणार?

चहल यांना ३१ मे रोजी चार वर्षे पूर्ण होणार आहेत. त्याचप्रमाणे अन्य दोन अपर आयुक्तांचाही तीन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ महापालिकेवर पूर्ण झाला आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, कामांचा धडाका लावण्यासाठी हे अनुभवी अधिकारी सरकारसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार निवडणूक आयोगाला पुन्हा नेमके काय उत्तर देते की या अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेते, हे पाहावे लागणार आहे.

टॅग्स :भारतीय निवडणूक आयोगमहाराष्ट्र सरकार