तीन महिन्यांत विकास खारगेंची बदली
By admin | Published: January 2, 2015 01:45 AM2015-01-02T01:45:33+5:302015-01-02T01:45:33+5:30
काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रालयातून अतिरिक्त आयुक्त पदावर बदली करण्यात आलेले विकास खारगे यांची अवघ्या तीन महिन्यांत तडकाफडकी पुन्हा बदली करण्यात आली आहे़
मुंबई : काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रालयातून अतिरिक्त आयुक्त पदावर बदली करण्यात आलेले विकास खारगे यांची अवघ्या तीन महिन्यांत तडकाफडकी पुन्हा बदली करण्यात आली आहे़ त्यांना वन खात्याच्या सचिवपदावर पाठविण्यात आले आहे. कडक शिस्तीचे खारगे यांचे सत्ताधारी युतीशी सूत न जुळल्यामुळेच बदली झाल्याचे सांगण्यात येते.
केंद्र व राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असल्याने शिवसेना-भाजपा युतीवर अंकुश ठेवण्यासाठी मर्जीतील अधिकारीच पालिकेत पाठविले जात असत. त्याच काळात खारगे यांची बदली अतिरिक्त आयुक्त पदावर झाली़ सनदी अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली होत असते़ मात्र खारगे यांची बदली केवळ तीन महिन्यांत झाली़ खारगे कडक शिस्तीचे असल्याने त्यांनी राजकीय मंडळी व प्रसिद्धिमाध्यमांपासून अंतर ठेवले होते़ त्यामुळे त्यांच्या विरोधकांची संख्या वाढली होती़ तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतरही बदली न झालेले अधिकारी पालिकेत आहेत़ मात्र खारगे यांच्या बदलीमागे राजकीय दबावच कारणीभूत असल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)
कडक शिस्तीचे खारगे यांची तीन महिन्यात बदली झाल्याने पालिकेत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. शिस्तीच्या अट्टहासामुळे त्यांचे विरोधक वाढल्याचे बोलले जाते.