Join us  

मुंबई पोलीस दलातील ७७ अधिकाऱ्यांची बदली, ११ सहाय्यक आयुक्तांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 9:30 AM

Mumbai Police Transfer News: खारमध्ये खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांखाली एका अधिकाऱ्यासह तीन अंमलदारांना निलंबित केल्यानंतर, आता खार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मोहन माने यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.

 मुंबई  - खारमध्ये खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांखाली एका अधिकाऱ्यासह तीन अंमलदारांना निलंबित केल्यानंतर, आता खार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मोहन माने यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. माने यांच्या जागी नवी मुंबईतून मुंबईत नियुक्ती मिळालेल्या संजीव धुमाळ यांच्यावर खार पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासह मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या ७७ अधिकाऱ्यांची बदली आणि नवीन नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

माने यांच्यासह २७ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यात सचिन कदम यांना भोईवाडा पोलीस ठाणे, राजेश कासारे यांना माहीम पोलीस ठाणे, दीपक दळवी यांना आझाद मैदान पोलीस ठाणे, सतीश गायकवाड यांना खेरवाडी पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, मुंबईत नियुक्ती  मिळालेल्या सहा अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

बढती, बदली आणि नियुक्ती    मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या १० अधिकाऱ्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती तर, मुंबईतील पोलीस ठाण्यांची जबाबदारी असलेल्या १३ वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना मुंबईत सहायक पोलीस आयुक्तपदी नेमणूक देण्यात आली आहे.    चार वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना बढती देऊन त्यांची मुंबईबाहेर नियुक्ती देण्यात आली असून मुंबईत बदली होऊन आलेल्या दोन अधिकाऱ्यांची त्यांच्या जागी नेमणूक करण्यात आली आहे.    मुंबईत कार्यरत असलेल्या ११ सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून मुंबई पोलीस दलात नियुक्ती मिळालेल्या तीन अधिकाऱ्यांना नेमणूक देण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबई पोलीसबदली