मनीषा म्हात्रे, लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना सत्ताधारी पक्षात प्रवेश करता यावा यासाठी सत्ताधाऱ्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (एसआरए) अधिकाऱ्याची थेट पुण्यात बदली केली आहे. याच अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पेडणेकर यांच्याविरुद्ध पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच त्यांना घर आणि कार्यालयही रिकामे करावे लागले होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ताईंच्या पक्षप्रवेशाला अधिकाऱ्याच्या बदलीचे गिफ्ट देण्यात आल्याची चर्चा एसआरएमध्ये रंगली आहे.
डोंबिवलीतील रहिवासी असलेले उदय पिंगळे हे एसआरएच्या वांद्रे येथील कार्यालयात सहकारी अधिकारी श्रेणी-१ या पदावर ऑक्टोबर २०२० पासून कार्यरत होते. जानेवारीत पिंगळे यांच्या तक्रारीवरून निर्मलनगर पोलिस ठाण्यात किशोरी पेडणेकर यांच्यासह किश कंपनी आणि अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लोअर परेलमधील गोमाता जनता एसआरए को-ऑप. हौसिंग सोसायटीत किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टीधारक नसतानाही सदनिकांचा गैरफायदा घेतला. किशोरी पेडणेकर, शैला गवस, प्रशांत गवस, गिरीश रेवणकर आणि साईप्रसाद पेडणेकर यांनी प्राधिकरणाची फसवणूक केली असल्याची तक्रार पिंगळे यांनी पोलिसांत दिली होती. तसेच, गेल्यावर्षी डिसेंबरअखेरीस त्यांच्या फ्लॅट आणि कार्यालयाला टाळे ठोकले होते.
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पिंगळे यांची पुण्यातील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणात बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ४ जून रोजी पिंगळे पुण्याला रवाना झाले.
‘एसआरएतून माहिती घ्या’
राजकीय स्वार्थापोटी आणखी एका अधिकाऱ्याचा बळी दिल्याची चर्चा एसआरएत सुरू आहे. उदय पिंगळे यांच्याकडे या प्रकरणाच्या तपासाविषयी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी काही माहिती लागल्यास एसआरएतून घेणे योग्य राहील, असे सांगितले.
ती बदली भीतीपोटी
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. मला शिंदे गटात जाण्याची इच्छा नाही, आणि कितीही आमिष वा दबाव असला तरी कधीच जाणार नाही. एसआरए अधिकारी उदय पिंगळे यांच्यावर राग नाही. ते ताबेदार होते. केलेल्या चुकीच्या कारवाईविरोधात न्यायालयीन लढाई सुरू आहे. लवकरच, संबंधितांवर कारवाईही होईल. कारवाईच्या भीतीने त्यांची बदली केली असावी. आमची इमारत पुनर्विकासासाठी गेल्याने आमच्या इमारतीतील ११ जण २००८ पासून या ठिकाणी भाड्याने राहत होते. त्यातील १० जण राजकारणात नसल्याने सुटले. मी राजकारणात असल्यामुळे मला अडकविण्यात आले. मात्र, न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. कागदोपत्री ते सिद्धही होईल. - किशोरी पेडणेकर, माजी महापौर, मुंबई