एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा
पालकमंत्र्यांच्या पालिका आयुक्तांना सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियमित बदली करण्याची सूचना राज्याचे वस्त्रोद्योग आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्राद्वारे केली.
अधिक परिणामकारकपणे काम व्हावे, यासाठी विहित कालावधीत बदली केली जाते. मात्र, मुंबई महापालिकेत अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे त्यांची एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. हे टाेळके नियमबाह्य पद्धतीने विशिष्ट लोकांना लाभ पोहोचविण्यासाठी मनमानी कारभार करतात, अशी चिंता पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
पालिका आयुक्त म्हणून विविध पदांवरील अधिकाऱ्यांची वेळोवेळी बदली प्रक्रिया राबविणे आपली जबाबदारी आहे. एकाच विभागात बराच काळ अथवा कायम कार्यरत राहिल्याने हितसंबंध निर्माण होतात. त्यामुळे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त काळ एखाद्या पदावर चिकटून बसलेले किंवा ज्यांचा कार्यकाळ संपला आहे, अशा लोकांच्या बदलीची प्रक्रिया तातडीने राबविण्याची सूचना त्यांनी केली.
......................