संजय पाण्डेय यांची बदली
By Admin | Published: March 23, 2015 02:06 AM2015-03-23T02:06:48+5:302015-03-23T02:06:48+5:30
गेल्या काही दिवसांत बिल्डर लॉबीसह आॅइलमाफियांना शासन निर्णयांनी मेटाकुटीला आणलेल्या वैध मापनशास्त्र अर्थात वजनमापे विभागातील नियंत्रक संजय पाण्डेय यांची अखेर बदली करण्यात आली.
मुंबई : गेल्या काही दिवसांत बिल्डर लॉबीसह आॅइलमाफियांना शासन निर्णयांनी मेटाकुटीला आणलेल्या वैध मापनशास्त्र अर्थात वजनमापे विभागातील नियंत्रक संजय पाण्डेय यांची अखेर बदली करण्यात आली. बिल्डर आणि आॅइलमाफियांच्या दबावामुळेच ही बदली झाल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली
आहे.
पाण्डेय यांनी घराचे चटईक्षेत्र चौरस फूट नव्हे, तर चौरस मीटरमध्ये मोजण्याची सक्ती केली होती. शिवाय जे बिल्डर रहिवाशांना करारनाम्यानुसार क्षेत्रफळ देणार नाहीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पाण्डेय यांनी दिले होते. शिवाय या प्रकरणात बिल्डरांना मदत करणाऱ्या साहाय्यक उपनिबंधकांवरही गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला होता.
वैध मापनशास्त्र विभागातील भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांत विभागाचे निरीक्षकही सामील असल्याचे मत त्यांनी बेधडकपणे व्यक्त केले होते. मात्र त्यांनी सीएनजी पंप आणि टँकर व लॉरी कॅलिब्रेशन सेंटरवरबाबत घेतलेल्या निर्णयानंतर संबंधित संघटनांनी राज्यव्यापी बंदची हाक देत निर्णयावर स्थगिती मिळवली होती. त्यामुळे पाण्डेय यांच्यावर राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट होऊ लागले होते. त्यांच्या या धडाकेबाज निर्णयाने शासनाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पडली होती. अनेक लॉबींसह बड्या शासकीय अधिकाऱ्यांच्या ते हिट लिस्टवर होते.
पुणे येथील राज्याच्या महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालक या पदावर गुरुवारी पाण्डेय यांना पदोन्नती देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी असलेल्या पोलीस महासंचालक या पदात श्रेणी उन्नत करून हे पद निर्माण करण्यात
आले आहे. त्यामुळे पाण्डेय यांची पदोन्नती करून केलेल्या बदलीवर अधिक संशय व्यक्त केला जात
आहे. (प्रतिनिधी)
आॅइल आणि पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक
करणाऱ्या गाड्यांना खाजगी कॅलिब्रेशन सेंटरवर कॅलिब्रेशन करण्यास पाण्डेय यांनी मज्जाव केला होता. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेल चोरीचा संबंध कॅलिब्रेशन सेंटरशी असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला होता.
पाण्डेय यांच्या धडाकेबाज निर्णयाने शासनाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पडली. अनेक लॉबींसह बड्या शासकीय अधिकाऱ्यांच्या ते हिटलिस्टवर होते. त्यांची बदली करण्यासाठी बिल्डर लॉबीने जोरदार प्रयत्न केल्याची चर्चा आहे.