मुंबई : निवडणूक आयोगाने निर्देश देऊनही मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, अश्विनी भिडे आणि पी. वेलरासू यांची बदली झाली नाही. या अधिकाऱ्यांच्या वेळीच बदल्या झाल्या पाहिजेत, तरच मुंबईतील निवडणुका मोकळ्या आणि निर्भय वातावरण पार पडतील, अशी भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे. या अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी वडेट्टीवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
निवडणूक आयोगाने एकाच जिल्ह्यात तीन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे चहल, सुधाकर शिंदे, अश्विनी भिडे आणि पी. वेलरासू यांची बदली अटळ मानली जात असताना राज्य सरकारने अद्याप या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे.