Join us

भ्रष्टाचारावर कारवाई करणाऱ्या कस्टम विभागातील दोन अधिकाऱ्यांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 6:28 AM

सोशल मीडियावरून टीकेची झोड; कार्गोतील गैरसुविधा चव्हाट्यावर आणल्याने उचलबांगडी

मुंबई : केंद्रीय सीमा शुल्क (कस्टम) विभागातील मुंबईतील दोन वरिष्ठ अधिकाºयांची आकस्मित केलेली बदली सध्या अधिकारी व कर्मचारी वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. राजीव शक्तीवेल आणि साहाय्यक आयुक्त दीपक पंडित यांना एअर कार्गोच्या दक्षता विभागातून अन्यत्र हलविण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. या निर्णयाविरुद्ध सोशल मीडियावरूनही टीका करण्यात येत आहे.

सीमा शुल्क विभागाच्या दिल्लीतील मुख्यालयातून दोघांच्या बदलीचे आदेश २२ जुलैला जारी करण्यात आले. दीपक पंडित यांची ‘सीजीएसटी’मध्ये बदली करण्यात आली आहे. उपायुक्त दर्जाच्या तीन अधिकाºयांचे गैरव्यवहाराचे प्रकरण त्यांनी चव्हाट्यावर आणले होते. त्याची चौकशी प्रलंबित असताना दबावातून त्यांची कार्गो येथील दक्षता विभागातून केवळ सात महिन्यांमध्ये बदली करण्यामागे ‘आयआरएस’ व ठेकेदारांची लॉबी कार्यरत असल्याचा आरोप सोशल मीडियातून केला जात आहे. मूळचे क्रिकेटर असलेल्या दीपक पंडित यांनी गेल्या तीन दशकांच्या कार्यकाळात सीमा शुल्क विभागात विविध कक्षामध्ये उल्लेखनीय काम केले आहे. वांद्रेतील अल्फा येथे कर्तव्यावर असताना त्यांनी केलेली धडक कारवाई चर्चेचा विषय बनली होती. सात महिन्यांपूर्वी त्यांची एअर कार्गोच्या दक्षता विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी कारवाईचा धडाका लावला होता. अवैध व कर चुकवून आणलेली कोट्यवधी रुपयांची घड्याळे तसेच अन्य किमती ऐवज त्यांनी जप्त केला होता. त्याचप्रमाणे कार्गो येथे सेवा पुरवित असलेल्या ‘जिविके’ व मिहाल कंपनीच्या गैरसुविधा व निकृष्ट दर्जाच्या साहित्याबाबत कारवाई करत त्यांना नोटिसादेखील बजाविल्या होत्या. हे प्रकरण अंगलट येण्याच्या शक्यतेमुळे संबंधित कंपनीचे अधिकारी व ‘आयआरएस’ लॉबी अडचणीत होती. त्यामुळे त्यांनी केंद्रातून दबाव आणून पंडित यांची अवघ्या ७ महिन्यांत तेथून बदली केल्याची चर्चा विभागात सुरू आहे. या निर्णयाविरोधात व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर आणि फेसबुकवरूनही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. केंद्र सरकारने या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.दीपक पंडित यांची धडाकेबाज कारवाईसाहाय्यक आयुक्त दीपक पंडित यांनी आतापर्यंत ५० कोटींहून अधिक मालाची तस्करी करणाºयांवर कारवाई करून शासनाला महसूल मिळवून दिला होता. तसेच सीमा शुल्क विभागात वरिष्ठ दर्जाच्या अधिकाºयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण चव्हाट्यावर आणले. त्यांची चौकशी सध्या प्रलंबित आहे. याशिवाय त्यांना १० लाखांची लाच देणाºया दोघांवर त्यांनी केंद्रीय गुन्हा अन्वेषणच्या(सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई केली होती.

टॅग्स :भ्रष्टाचारमुंबई