लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पोलिस उपायुक्तांपाठोपाठ मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या २५० पोलिस निरीक्षकांच्या आणि १०६ सहायक पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिस आयुक्त स्तरावरील आस्थापना मंडळाने या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
पोलिस निरीक्षकांच्या करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये सर जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, वाहतूक शाखेतील पोलिस निरीक्षक आत्माजी सावंत आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक दीपक सुर्वे अशा तीन अधिकाऱ्यांची गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, वडाळा टी. टी. पोलिस ठाण्यातील संदीप बडगुजर यांच्यासह एकूण २० अधिकाऱ्यांची वाहतूक विभागात नियुक्ती देण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीतील दोन पदाधिकाऱ्यांवरील हल्ल्याचा तपास करत असलेल्या भोईवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक संजय निकम यांची मलबार हिल पोलिस ठाणे, वडाळा टी टी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सुनील वाघमारे यांची सर जे. जे. मार्ग पोलिस ठाणे, यलोगेट पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक महेश पाटणकर यांची दादर पोलिस ठाणे आणि ॲन्टाॅप हिल पोलिस ठाण्यातील महिला पोलिस निरीक्षक प्रभा राऊळ यांची संरक्षण आणि सुरक्षा विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
२० अधिकाऱ्यांचा बढतीसाठी पात्र यादीत समावेश
सहायक पोलिस आयुक्त/ पोलिस उपअधीक्षक पदावर बढती मिळालेल्या आठ अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले आहे. तर, दक्षिण प्रादेशिक विभाग येथे कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्यासह २० अधिकाऱ्यांचा बढतीसाठी पात्र अधिकाऱ्यांच्या निवडसूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे. अनुप डांगे गावदेवीतून भायखळा पोलिस ठाण्यात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप आणि तक्रार करणाऱ्या पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांची गावदेवी पोलिस ठाण्यातून भायखळा पोलिस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.