लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निवडणूक काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट असताना मुंबई महापालिकेने दादर, माहीम आणि धारावी या भागातील काही अभियंते व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यामुळे पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बदल्या राजकीय दबावाने झाल्याचा आरोप करत म्युनिसिपल कर्मचारी सेना पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन आक्षेप नोंदवणार आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता निकाल जाहीर होईपर्यंत लागू आहे. या कालावधीत विकासकामे, बदल्या-बढत्या, नियुक्त्या करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणे बंधनकारक असते. अगदी अपवादात्मक परिस्थितीत बदल्या व पदस्थापना करता येते. मात्र, ती परिस्थिती निवडणूक आयोगाला पटवून द्यावी लागते. महापालिकेतील या बदल्यांसाठी कोणती असाधारण परिस्थिती होती, याबाबतची माहिती उपलब्ध झाली नाही; पण जी- उत्तर विभागातील काही अभियंते व कर्मचाऱ्यांचे प्रभाग बदलण्यात आले आहेत. या विभागात दादर, माहीम आणि धारावी हा भाग येतो जो मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. पालिका प्रशासनाच्या या निर्णयाला राजकीय वास येत असून नेमका कोणासाठी हा खटाटोप सुरू आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात युनियन अतिरिक्त आयुक्तांची भेट घेणार असल्याचे युनियनचे संजय कांबळे यांनी सांगितले.
आयोगाच्या आदेशाने आधी तीन बदल्याअलीकडेच पालिकेत झालेल्या काही मोठ्या बदल्या चर्चेचा विषय बनला होता. मात्र त्या थेट निवडणूक आयोगाच्या आदेशाने झाल्या होत्या. तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाल्यामुळे पालिकेचे तत्कालीन आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू आणि अश्विनी भिडे यांची बदली करावी लागली होती.
२०२१ च्या परिपत्रकानुसार अभियंता संवर्गाच्या बदल्या करण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांना (पूर्व उपनगरे) आहेत. सहायक आयुक्त बदल्यांचा प्रस्ताव तयार करून तो नगर अभियंत्याकडे पाठवतात. तेथे तो मंजूर होऊन अंतिम मंजुरीसाठी अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवला जातो. या प्रकरणात अधिकार नसताना उपायुक्तांनी आदेश काढले आहेत. यासंदर्भात आम्ही अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांची भेट घेऊन आमचा आक्षेप नोंदवणार आहोत.- संजय कांबळे, म्युनिसिपल कर्मचारी सेना
धारावी विभागात १८३ ते १८६ या प्रभागात सहायक अभियंते, दुय्यम अभियंते आणि कनिष्ठ अभियंते मिळून पाच जणांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. माहीम विभागात १८२, १८७, १८८ व १९० मध्ये, तर दादर भागात प्रभाग क्रमांक १८९, १९१ व १९२ मध्ये नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. २२ एप्रिल रोजी यासंदर्भातील कार्यालयीन आदेश काढण्यात आला असून त्यापूर्वीच आचारसंहिता लागू झाली होती. ७ मे पासून या नियुक्त्या अंमलात आल्या असून नवा आदेश येईपर्यंत त्या कायम राहतील.