लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एक पोलीस ठाणे किंवा शाखेत दोन वर्षांचा सेवा कालावधी निश्चित असताना गेल्या सुमारे साडेतीन वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या मुंबईतील सुमारे सातशेवर पोलीस उपनिरीक्षकांना (पीएसआय) अखेर अन्यत्र हलविण्याला एकदाचा ‘मुहूर्त’ मिळाला आहे. त्यांच्यासह ८६७ अधिकाऱ्यांच्या पोलीस आयुक्तालयांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी त्वरित कार्यमुक्त करण्यात यावे, अशी सूचना पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना केली आहे.पोलीस उपनिरीक्षकांच्या १०६ नंबरच्या सातशे जणांच्या बॅचमधील बहुतांश अधिकाऱ्यांची प्रशिक्षणार्थी म्हणून आॅक्टोबर २०१३ मध्ये मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत नियुक्ती झाली होती. त्यांचा एक वर्षाचा पर्यवेक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची त्याच पोलीस ठाण्यात पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली. बदली अधिनियम २०१५ च्या अध्यादेशानुसार एका ठिकाणी दोन वर्षांच्या नियुक्तीचा कालावधी असताना दीड वर्षापासून त्यांची बदली करण्यात आलेली नव्हती. तर २०१५ मध्ये उपनिरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्या होत्या. त्यांचाही कालावधी पूर्ण होऊन दोन महिने उलटून गेले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांच्या बदलीचा निर्णय प्रलंबित होता. अखेर गेल्या आठवड्यात साहाय्यक निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढल्यानंतर पोलीस आयुक्तांनी बुधवारी पोलीस पत्रकानुसार ८६७ पीएसआयच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी त्वरित कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस ठाणे व शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांना बजाविण्यात आले आहेत. प्रलंबित निर्णय मार्गीदोन महिने उलटून गेले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बदलीचा निर्णय प्रलंबित होता. गेल्या आठवड्यात साहाय्यक निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढल्यानंतर पोलीस आयुक्तांनी बुधवारी पोलीस पत्रकानुसार बदल्यांचे आदेश जारी झाले
पीएसआयच्या बदल्यांना ‘मुहूर्त’
By admin | Published: July 07, 2017 6:50 AM