पाच वर्षांत २५३ पालिका शाळांचा कायापालट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 10:17 AM2023-11-23T10:17:24+5:302023-11-23T10:17:46+5:30
३८ शाळांचे काम प्रगतिपथावर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रंग उडालेल्या इमारती, गळके छप्पर, तुटके बाक असे चित्र असलेल्या मुंबई महापालिकेच्या शाळांचा गेल्या काही वर्षांत कायापालट झाला आहे. गेल्या पाच वर्षांत २५३ शाळांची कामे करून पालिकेने त्या सुस्थितीत आणल्या. आणखी १२० शालेय इमारतींना दुरुस्ती व पुनर्बांधणीची गरज असून, त्यापैकी ३८ शाळांचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाईल.
सुमारे २० वर्षांपूर्वी पालिका शाळेच्या दुरुस्तीचा प्रश्न चांगलाच गाजला होता. पालिका शाळांची दुरुस्ती, देखभाल करण्यासाठी आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने धनुका समिती नेमली. या समितीच्या शिफारशींनुसार पालिकेने पहिल्या टप्प्यात १२८ शाळांमध्ये सुधारणा केली. आताही पालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या एकूण ४७९ शालेय इमारतीचे वरचेवर स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येते. यामुळे कायम लाल-पांढऱ्या रंगात दिसणाऱ्या पालिका शाळांचे रंगरूप पालटले आहे. पिवळा, गुलाबी अशा वेगवेगळ्या रंगांच्या या शाळा लक्ष वेधून घेणाऱ्या ठरत आहेत.
२०२३-२४ या आर्थिक वर्षात दुरुस्ती व पुनर्बांधणी करून सुस्थितीत आलेल्या शाळांची संख्या २५३ आहे, तर ५५ शाळांची दुरुस्ती व पुनर्बांधणी प्रगतिपथावर आहे. त्यापैकी १७ शाळांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर ३८ कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती पालिकेच्या नगर उपअभियंता यांनी दिली. या ३८ कामांपैकी ३० कामे दुरुस्तीची आहेत. उर्वरित आठ शाळा नव्याने बांधण्यात आल्या आहेत.
बांधकाम पूर्ण होऊ घातलेल्या शाळा
शिवरी यूपी एलपी मनपा शाळा, नेहरूनगर मनपा शाळा, आणिक विलेज मनपा शाळा, सी.टी.एस.११११ (कांदिवली), सखाराम तरे मनपा शाळा, संभाजीनगर मनपा शाळा (कांदिवली), गिल्बर्ट हिल मनपा शाळा, देवनारपाडा मनपा शाळा, माहुल एमआरए मनपा शाळा, वाकोला मनपा शाळा, वडवली मनपा शाळा, नवपाडा हिंदी शाळा, पोईसर मनपा शाळा, अयोध्यानगर मनपा शाळा, काजुपाडा मराठी शाळा.
पालिकेच्या शाळांची सद्य:स्थिती
१२० इमारतींची दुरुस्ती व पुनर्बांधणीच्या शाळा
५५ दुरुस्ती-पुनर्बांधणीची कामे प्रगतिपथावर असलेल्या शाळा
२५३ सुस्थितीतील शाळा
४७९ एकूण शाळा