लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रायगड जिल्ह्यातील एलिफंटा लेणी हे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे स्थळ आहे. दरवर्षी जगभरातून सुमारे ८ ते १० लाख पर्यटक या ठिकाणी येतात. परंतु एकीकडे पर्यटकांची संख्या जास्त असताना दुसरीकडे एलिफंटा येथील जेट्टीची जागा बोट लावण्यासाठी कमी पडत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. परिणामी, या कमी जागेमुळे पर्यटकांचा अपघात होण्याचीही संभावना आहे. त्यामुळे हे टाळण्यासाठी आता लवकरच राज्य शासनाच्या वतीने एलिफंटा जेट्टीचा विस्तार करण्यात येणार आहे. या विस्तारासाठी राज्य शासनाने तब्बल ८७ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
या निधीतून जेट्टीवर २३५ मीटर लांबीचे बांधकाम करण्यात येणार आहे, तसेच, बर्थिंग जेट्टीसाठी ८५ मीटर लांबीचा मार्ग वाढविण्यात येणार आहे. तसेच, या जेट्टीच्या कामासाठी गाळ काढण्याची प्रक्रियाही हाती घेण्यात येणार आहे.
पर्यटकांना सोयी-सुविधाn जेट्टीचा विस्तार कामाचा प्रस्ताव महाराष्ट्र सागरी मंडळ यांनी सादर केला आहे. जेट्टीच्या सद्य:स्थितीमुळे पर्यटकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यावर तोडगा काढण्यासाठी आता जेट्टीची लांबी व रुंदी वाढविण्यात येणार आहे. n पर्यटकांच्या दृष्टिने या ठिकाणी मूलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या विस्तार कामासाठी केंद्र शासनाकडून ५० टक्के निधी देण्यात येणार आहे, त्याप्रमाणे हा निधी प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाकडून निधी वितरित केला जाणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.
जेट्टीवर जागा कमी, पोचरस्ता अरुंदn एलिफंटा येथील शेतबंदर जेट्टीला प्रवासी चढ -उतार करण्यासाठी सहा ठिकाणी बोटी लावता येतात. गर्दीच्या वेळेस या जेट्टीस प्रवासी बोटी लागण्याकरिता जागा कमी पडत असल्याने त्यांना जेट्टीसाठीची जागा रिकामी होण्याची वाट पाहावी लागते. n जेट्टीला असणाऱ्या पायऱ्या मोडकळीस आलेल्या असून जेट्टीही नादुरुस्त अवस्थेत आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशी, पर्यटक यांना अपघात होण्याची शक्यता आहे. जेट्टीवर प्रवासी, पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांची कमतरता आहे. n जेट्टीवरील पोचरस्त्यावर मिनी ट्रेन धावत असल्याने, रस्त्याच्या कडेला पूर्वीपासून दुकानेही असल्याने प्रवाशांना- पर्यटकांना रस्त्यावरून चालण्यास अडचण निर्माण होते.