‘व्याघ्र परिचय केंद्रा’चा कायापालट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 11:34 PM2019-03-03T23:34:59+5:302019-03-03T23:35:10+5:30
बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता वाघांची संपूर्ण माहिती नव्या स्वरूपात पर्यटकांना अनुभवता येणार आहे.
मुंबई : बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता वाघांची संपूर्ण माहिती नव्या स्वरूपात पर्यटकांना अनुभवता येणार आहे. व्याघ्र परिचय केंद्राचे स्वरूप बदलण्याची योजना आखली असून, वाघांबाबत असलेले आकर्षण लक्षात घेऊनच आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे व्याघ्र परिचय केंद्राचा कायापालट लवकरच करण्यात येणार आहे.
गुहेच्या आकारातील दोनमजली इमारत, रॉयल बंगाल प्रजातीच्या वाघापासून देशातील सर्व वाघांच्या प्रजातींचा इतिहास आणि अधिवास अशी परिपूर्ण माहिती पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र-सिंह सफारी हे पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण आहे. या सफारीत जाण्यापूर्वी परिचय केंद्राकडे असलेल्या तिकीट खिडकीची व्यवस्था आहे. या सफारीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता, वाघांविषयी शास्त्रीयदृष्ट्या माहिती देण्यासाठी अद्ययावत दुमजली इमारत उभारली जाणार आहे. राष्ट्रीय उद्यानाने त्यासाठी गुंफेच्या आकाराच्या इमारतीच्या प्रस्तावित आराखड्यास अनुकूलता दर्शविली आहे. सुमारे १०० कोटी रुपये खर्चून येथे सोईसुविधा दिल्या जातील, अशी माहिती उद्यान प्रशासनाने दिली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य संचालक अन्वर अहमद यांनी सांगितले की, वाघांच्या प्रजातींची माहिती देणारे केंद्र उभारले जात आहे. यातून वाघांची इत्थंभूत माहिती पर्यटकांना दिली जाईल. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वन्यप्राणी व पर्यावरणाचे शिक्षण दिले जाईल. हे काम अहमदाबाद येथील कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्यक्ष बांधकाम केले जाणार आहे. एकाच वेळी ५० पर्यटक निवांतपणे परिचय केंद्रात फिरू शकतात. या केंद्रात ‘एलसीडी’च्या मदतीनेही वाघांचा इतिहास, वर्तमान दाखविले जाईल. या ठिकाणची तिकीट खिडकी काही अंतरावर बांधण्यात येणार असून, सभोवताली पर्यटकांना बसण्यासाठी उत्तम जागा बांधली जाणार आहे. तिथे १००हून अधिक पर्यटक सफारीसाठीच्या वाहनांची प्रतीक्षा करू शकतात.
>निसर्ग माहिती केंद्रात बदल
निसर्ग माहिती केंद्रातील छत हे फुलपाखराच्या आकाराचे असेल. उद्यानात प्रवेश केल्यावर काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या निसर्ग माहिती केंद्रातही काही बदल घडविले जातील.
उद्यानात सौरऊर्जेच्या वापरावरही भर दिला जाणार आहे. त्यातून पारंपरिक विजेचा वापर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. पर्यटकांना वेगवेगळ्या पशुपक्ष्यांच्या प्रजातीही पाहता येणार आहेत.
>टॅक्सीडर्मी पाहण्याची संधी
टॅक्सीडर्मीच्या तंत्राने जिवंत रूप मिळालेल्या प्राण्यांना पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. मृत वन्यप्राण्यांना टॅक्सीडर्मी तंत्राच्या साहाय्याने अक्षरश: जिवंत असल्याचा भास निर्माण केला जातो. प्राण्याची त्वचा, अवयवांच्या साहाय्याने या मृत प्राण्यांना जिवंत रूप दिले जाते. प्राण्यांना पाहण्याची संधी देण्यासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध केले जाईल.