Join us

'तृतीयपंथीयांचा वापर फक्त मतांसाठी करू नका!'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 1:28 PM

आम्हाला वेगळं असं काही नको, फक्त आमचा स्वीकार करा!

स्नेहा मोरे मुंबई - लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मान्यवरांची मदत घेतली आहे. या मान्यवरांत आयोगाने पहिल्यांदाच तृतीयपंथी वर्गातील श्रीगौरी सावंत यांचीही सदिच्छादूत म्हणून नेमणूक केली आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत....

सदिच्छादूत म्हणून निवड झाल्यावर तुमची प्रतिक्रिया काय होती?

उत्तर : पहिल्यांदाच तृतीयपंथी व्यक्तीची सदिच्छादूत म्हणून निवड झाली आहे. याचा आनंद असला तरी सलही आहे, कारण या निवडीस थोडा उशीर झाला आहे. स्त्री असो वा पुरुष, आपले संविधान प्रत्येकाला समान हक्क व समान अधिकार देते. त्याला आमचा समाजही अपवाद नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमच्या समाजातील अधिकाधिक मतदारांनी पुढे येऊन मतदान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. मला माझी लैंगिक ओळख मिळाली, मात्र मतदानाचा हक्क मिळायला उशीर झाला.

आपल्या समाजातील मतदारांना जागृत करण्यासाठी कसे प्रयत्न करणार आहात?

उत्तर : तृतीयपंथींसोबतच समाजातील सर्व वयोगटातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. तृतीयपंथींना मतदार म्हणून नाव नोंदविताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या समाजाला ओळख दिल्यानंतर मी अनेक संस्था आणि विविध पातळ्यांवर काम करत आहे. त्यामुळे या संस्था, संघटनांशी बोलून त्यांनाही सहभागी करून घेत जनजागृती करणार आहे.

सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?

उत्तर : आम्हाला वेगळा दवाखाना नको, आम्हाला वेगळी शाळा नको. फक्त आहे त्या समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घ्या हीच आमची प्रमुख मागणी आहे. आम्ही सर्वसामान्यांसारखे आहोत, त्यामुळे आमच्यासाठी काही वेगळे करू नका. आमचा माणूस म्हणून स्वीकार करा, एवढीच मागणी आहे. याशिवाय आगामी निवडणुकांचा विचार करता केवळ मतांसाठी आमचा वापर करून घेऊ नका. सामान्य मतदार म्हणून आम्हालाही मूलभूत सुविधा आणि सेवा मिळाव्यात एवढीच अपेक्षा आहे.

तृतीयपंथी मतदार म्हणून नाव नोंदवताना कोणत्या अडचणी येतात?

उत्तर : आपल्याकडील यंत्रणांमध्ये तृतीयपंथींविषयी अनेक गैरसमज आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अजूनही समाजाच्या विविध स्तरांतून आमचा हवा तसा स्वीकार झालेला नाही. परिणामी विविध पातळ्यांवर अजूनही आमचा संघर्ष कायम आहे. आमच्या समाजातील व्यक्तींनी लिंगबदलाचा निर्णय घेतल्यानंतर अजूनही गॅझेट ऑफिसर नाव बदलण्यासाठी नकार देतात. त्यामुळे आमच्या समाजाचा मतदानाचा टक्का वाढलेला दिसत नाही. यावर काम होणे गरजेचे आहे. सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अशा प्रकारच्या समस्यांवर काम करणार आहे, जेणेकरून आगामी निवडणुकांमध्ये आमच्या समाजाची मतदानाची आकडेवारी निश्चितच सकारात्मक दिसेल.

आम्हाला वेगळे म्हणून काही देऊ नका तर तुमच्यातील एक म्हणून आमचा स्वीकार करा.

- श्रीगौरी सावंत

 

टॅग्स :लोकसभा निवडणूकभारतीय निवडणूक आयोगट्रान्सजेंडर