ट्रान्सजेंडर घेणार मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांची काळजी
By मनोहर कुंभेजकर | Published: February 9, 2023 02:44 PM2023-02-09T14:44:18+5:302023-02-09T14:44:34+5:30
ट्रान्सजेंडर हे मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांसाठी काळजीवाहू ( केअरटेकर्स) म्हणून काम करणार आहेत.
मुंबई-भारतासह जगात जेष्ठ नागरिकांची संख्या वाढत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न वयोमानानुसार निर्माण होत असून आणि आजच्या छोट्या कुटंब प्रणालीत त्यांच्या कडे जातीने लक्ष देण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी अनेक कुटुंबांना मदतीचा हात लागतो. आता ट्रान्सजेंडर एक कदम या उपक्रमा अंतर्गत मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणार आहेत. मुंबईकर पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर्सना काळजीवाहू (केअरटकेर्स ) म्हणून काम करताना पाहणार असून अश्या प्रकारची ही देशातील पहिलीच घटना आहे.
ट्रान्सजेंडर हे मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांसाठी काळजीवाहू ( केअरटेकर्स) म्हणून काम करणार आहेत. सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल चेंज ( सीएसएससी ) आणि येस आय कॅन फाउंडेशनने ट्रान्सजेंडर्सना जेरियाट्रिक केअरचे प्रशिक्षण दिले आहे. या प्रशिक्षणामुळे ट्रान्सजेंडर्सना ज्येष्ठ नागरिकांसाठी काळजीवाहू- (केअरटेकर) म्हणून नोकरी मिळू शकते. पहिल्या बॅच मध्ये १८ ट्रान्सजेंडर्सना केअरटेकर म्हणून प्रशिक्षण त्यांच्या मानखुर्द येथील वस्तीत दिले गेले.आणि यामधून १८ ट्रान्सजेंडर्सची केअरटेकर म्हणून निवड केली.त्याचा शुभारंभ येत्या शनिवार दि,११ फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्कमध्ये दुपारी ३ ते ६ यावेळेत होणार आहे.
ट्रान्सजेंडर ज्येष्ठ नागरिकांसाठी काळजीवाहू म्हणून काम करणार आहेत.ते जेष्ठ नागरिकांकडून व्यायाम करून घेतील,त्यांच्या महत्वाच्या लक्षणांचे मोजमाप करतील,ज्येष्ठ नागरिकांच्या आहाराच्या गरजेनुसार पौष्टिक नाश्ता बनवतील आणि ते ज्येष्ठ नागरिकांना फिरायलाही घेऊन जातील अशी माहिती सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल चेंजच्या ( सीएसएससी ) व मुंबईच्या माजी महापौर अँड.निर्मला सामंत-प्रभावळकर व येस आय कॅन फाउंडेशनच्या नेहा खरे यांनी लोकमतला दिली.
शनिवारी दुपारी ३-३० वाजता ट्रान्सजेंडर हे सीएसएससी आणि येस आय कॅन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिवाजी पार्क परिसरतील आजींच्या घरी पोहचतील नंतर परिचय करून दिला जाईल.दुपारी ३.४५ ते ४.१५ यावेळेत ते जेष्ठ नागरिकांकडून मूलभूत हात,खांदा, मानेचा व्यायाम करून घेतील,४.३० ते ५ या दरम्यान चहा आणि नाश्ता बनवणे (उपमा) बनवतील, संध्याकाळी ५ ते ५.१५ दरम्यान उरलेल्या टेस्ट करतील,५.१५ ते ते ५.३० दरम्यान ते खुर्ची नृत्य सादर करतील,५.३० ते ५.४५ दरम्यान स्मृती चाचणी घेतील आणि ५.४५ ते ६.१० पर्यंत शिवाजी पार्कमध्ये जनजागृतीसाठी फेरी काढण्यात येईल अशी माहिती अँड.निर्मला सामंत-प्रभावळकर व नेहा खरे यांनी दिली. देशात पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर्स काळजीवाहू म्हणून काम करताना आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्वसमावेशक समाज घडवण्याचा प्रयत्न करतो.यामुळे समाजात जागरूकता निर्माण होईल आणि अनेक ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय पुढे येऊन स्वीकृती दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.