‘तांडव’च्या दिग्दर्शकांसह अन्य जणांचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:07 AM2021-01-21T04:07:48+5:302021-01-21T04:07:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘तांडव’ या वेब सिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, अमेझॉन प्राइम इंडियाच्या मुख्य अपर्णा पुरोहित, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘तांडव’ या वेब सिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, अमेझॉन प्राइम इंडियाच्या मुख्य अपर्णा पुरोहित, निर्माता हिमांशू मेहरा आणि लेखक गौरव सोलंकी यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल लखनऊमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने या सर्वांचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या सर्वांना लखनऊमध्ये संबंधित न्यायालयात उपस्थित राहता यावे, यासाठी उच्च न्यायालयाने चार जणांना तीन आठवड्यांचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक मुंबईत पोहचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सिरीजमध्ये ज्या पद्धतीने हिंदू देवांना दाखविण्यात आले आहे, त्यासंदर्भात अमेझॉन प्राइम व्हिडिओचे अधिकारी आणि अन्य जणांची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस मुंबईत आले आहेत.
ज्येष्ठ वकील आबाद पोंडा आणि अनिकेत निकम यांनी न्यायालयात जफर आणि अन्य जणांची बाजू मांडली.
आरोपी हे निर्दोष आहेत. त्यांना नाहक या प्रकरणात गोवण्यात आले आहे. उत्तर प्रदेश पोलीस या चौघांना अटक करण्यासाठी आले आहेत. त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात यावे, असा युक्तिवाद पोंडा व निकम यांनी केला.
पॉलिटिकल ड्रामावर आधारित तांडव या वेब सिरीजमध्ये सैफ अली खान, डिम्पल कपाडिया, गौहर खान, जिशान अयूब, सुनील ग्रोव्हर यांनी भूमिका केल्या आहेत. नऊ एपिसोड असणाऱ्या या वेब सिरीजमधून दिल्लीच्या आणि विद्यापीठाच्या राजकारणावर भाष्य करण्यात आले आहे.
..................