२७२ पात्र भाडेकरूंची संक्रमण सदनिका निश्चिती होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:06 AM2021-02-10T04:06:12+5:302021-02-10T04:06:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ येथे उभारण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये म्हाडा संक्रमण गाळ्यात स्थलांतरीत झालेल्या २७२ पात्र भाडेकरूंना वितरित करावयाच्या पुनर्वसन सदनिका संगणकीय प्रणालीद्वारे निश्चितीसाठी म्हाडा मुख्यालयात ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी शासनाने म्हाडाकडे सोपविली आहे. ना. म. जोशी मार्ग, परळ येथील बीडीडी चाळीत एकूण २ हजार ५६० रहिवासी असून, त्यांची पात्रता निश्चित करण्याकरिता सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण / निष्कासन) कुलाबा विभाग, मुंबई शहर यांची शासनाने नियुक्ती केली आहे. १० चाळींतील ८०० भाडेकरूंचे पात्रतेबाबत सर्वेक्षण करण्यात आले असून, ६०७ भाडेकरू आतापर्यंत पात्र ठरले आहेत. संक्रमण गाळ्यात स्थलांतरित होण्यासाठी आतापर्यंत म्हाडाने पात्र भाडेकरूंपैकी ३१४ भाडेकरूंशी जागेवरच करारनामा करून घेतला असून, यापैकी २७२ भाडेकरू संक्रमण गाळ्यात स्थलांतरित झाले आहेत.
जुन्या चाळीतून संक्रमण गाळ्यात घरातील सामानासह स्थलांतरणासाठी म्हाडातर्फे निःशुल्क वाहनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. संक्रमण गाळ्यांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्कही म्हाडातर्फे भरण्यात येत आहे. संक्रमण गाळ्यात स्थलांतरित भाडेकरूंकडून कुठलेही सेवा शुल्क घेण्यात आलेले नाही. मात्र, वीजबिल हे भाडेकरूंनी भरावयाचे आहे.